स्व. अजितदादांच्या निधनाचे दुःख व दुष्काळ लक्षात घेऊन सेवाभावी उपक्रम
पारनेर / ता. प्रतिनिधी,
पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या वाढदिवसाचा जल्लोष न करता मुक्या जीवांच्या सेवेतून नेत्यावरील प्रेम व्यक्त करण्याचा अनोखा उपक्रम पारनेर तालुक्यात राबविण्यात आला. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली शोकाकुल परिस्थिती आणि दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार काशिनाथ दाते सर यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या भूमिकेचा मान राखत समर्थकांनी शुभेच्छांच्या औपचारिकतेपेक्षा सामाजिक सेवेचा मार्ग निवडला.
पिंपळगाव रोठा येथील श्री कोरठण देशी गाय जतन संस्था, गोशाळेत पशुधनासाठी चारा व पाणी वाटप करून हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. प्रदीप दाते यांच्या नेतृत्वाखाली उद्योजक नंदु खामकर आणि मित्रपरिवाराने या सेवाकार्याचे आयोजन केले.
दुष्काळामुळे ग्रामीण भागात चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना त्याचा फटका मुक्या जनावरांनाही बसत आहे. अशा परिस्थितीत गोशाळेतील पशुधनाची गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणे, हीच या उपक्रमाची खरी जमेची बाजू ठरली. वाढदिवसानिमित्त होणारा उत्सव बाजूला ठेवून गरजू जीवांच्या सेवेला प्राधान्य देत आयोजकांनी सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश दिला.
नेत्यावरील प्रेम केवळ घोषणांतून नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करता येते. दुःखाच्या प्रसंगी संयम आणि दुष्काळाच्या काळात सेवाभाव जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम वाढदिवसाचे सामाजिक औचित्य साधणारा ठरला.
यावेळी आर. एस. कापसे सर, भास्कर उचाळे सर, सुरेश परंडवाल, सौ. रेश्माताई गलांडे, डॉ. प्रदीप दाते, नंदकिशोर खामकर, मच्छिंद्र गलांडे, कृष्णा मुरवदे, बापू खंदारे, राहुल येणारे, गणेश वाळूंज, स्वप्नील वाळूंज, विठ्ठलराव मोरे, प्रवीण उचाळे उपस्थित होते.
जल्लोषापेक्षा जीवदया आणि औपचारिक शुभेच्छांपेक्षा सेवाकार्य श्रेष्ठ, हा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत माणुसकीचा ओलावा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
