कलावंतांच्या प्रश्नांसाठी खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार – रविंद्र राजदेव

कलावंतांना शासन दरबारी न्याय मिळावा, मासिक मानधन व अनुदानाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी एकत्रित लढा उभारण्याची गरज

टाकळी ढोकेश्वर | प्रतिनिधी,

महाराष्ट्र ही कलावंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. मात्र, बदलत्या काळात पारंपरिक कला आणि लोककलावंतांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कलावंतांच्या प्रश्नांकडे शासनाचे पुरेसे लक्ष नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कलावंतांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी लोकनेते खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार असल्याची भूमिका टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रविंद्र राजदेव यांनी व्यक्त केली.


महाराष्ट्रातील सर्व कलावंतांना एकत्रित करून खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोर्चा काढण्यात यावा. या माध्यमातून कलावंतांच्या प्रलंबित मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांना मिळणारे अनुदान आणि आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा करावा, अशी अपेक्षाही राजदेव यांनी व्यक्त केली.

[ लावणी कलाकार गौरी कल्याणकर यांनी अप्रतिम अशी लावणी सादर केली. ]



जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य व बलुतेदार संघटना पारनेर तालुका व राजे उमाजी नाईक बहुजन आधार प्रतिष्ठान, पारनेर व जुन्नर तालुका छत्रपती शिवराय कलगीतुरा संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य आयोजित भव्य कला महोत्सव व मेळावा २०२६ सावरगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना राजदेव म्हणाले की, लोककलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. विठाबाई यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘पोटासाठी नाचते मी परवा कुणाची’ या भावनेतून अनेक कलावंत आपली संपूर्ण ऊर्जा खर्च करून रंगमंचावर कला सादर करतात. घरदार, कुटुंब आणि लेकराबाळांपासून दूर राहून ते कलेची सेवा करत असतात. मात्र, त्यांच्या कलेला दाद मिळत असली तरी त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे.

कलावंतांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने त्यांना नियमित मासिक मानधन द्यावे, आर्थिक अनुदान उपलब्ध करून द्यावे आणि पारंपरिक लोककला जिवंत ठेवण्यासाठी ठोस धोरण राबवावे. कला आणि कलावंत टिकले तरच महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचेल, असेही राजदेव यांनी नमूद केले.

या वेळी बाजार समितीचे संचालक शिवाजीराव बेलकर, माजी सरपंच रामभाऊ थोरात, बाळासाहेब शिरतार, अमोल चौधरी, रामदास साळवे, हरिभाऊ साळवे, जिजाबाहू चिकने, नवनाथ गांजे, संजय शिरतार, संदीप चिकने, रामलाल राजदेव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते दीपक आण्णा लंके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगारामशेठ बेलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मोहनशेठ रोकडे, नवनाथ गांजे पाटील, लोकनियुक्त सरपंच प्रकाश गाजरे, अमोल उगले, प्रकाश चिकणे, रामभाऊ थोरात, रणधीर शिंदे, शंकर शिंदे सर, दिगंबर भारती गुरुजी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.


[ प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सीमाताई पोटे आणि सुधाकर पोटे यांचा टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रविंद्र राजदेव यांच्या हस्ते सन्मान ]



कलावंतांच्या समस्या, त्यांच्या आर्थिक अडचणी आणि लोककलेच्या संवर्धनाचा महत्त्वपूर्ण विषय केंद्रस्थानी ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कलावंतांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजक बाळासाहेब सिरतार यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. कलावंतांच्या हितासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Exit mobile version