अहिल्यानगर / भगवान गायकवाड,
भौतिक प्रगती करीत असला तरी भारत देश जाती – धर्म – भाषा – लिंग यावर आधारित भेदभाव, शोषण आणि संघर्ष यांनी पूर्णतः ग्रासला आहे.देशाचे मानसिक विघटन रोखण्यासाठी तरुणाईची सद्भावना सायकल यात्रा विलक्षण साहस आणि औचित्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन डॉ. अशोक बेलखोडे यांनी काल सद्भावना सायकल यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी केले. स्नेहालय संस्थेच्या आजवरील विविध 11 सायकल यात्रांमुळे महामानव बाबा आमटे यांनी 1980 च्या दशकात काढलेल्या *भारत जोडो* सायकल यात्रांची भावधारा आणि उद्देश पुनरुज्जीवित केल्याचेही भारत जोडो सायकल यात्री असलेल्या डॉ. बेलखोडे यांनी नमूद केले.
मराठवाड्यातील संवेदनशील जिल्ह्यात सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या सद्भावना सायकल यात्रेस काल 31 प्रारंभ झाला.
स्नेहालय आणि समविचारी संस्थांनी याचे आयोजन केले आहे. नांदेड येथील सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा येथे डॉ.बेलखोडे, सचखंड गुरुद्वाराचे प्रमुख ग्रंथी सरदार कुलवंत सिंग, एक पाय नसतानाही बाबा आमटे यांच्या भारत जोडो सायकल यात्रेत सायकलवर सहभागी झालेले बाबा सूर्यवंशी, सी. ए. विजय मालपाणी आणि सी. ए.हर्षद शहा, रोटरी क्लबचे अध्यक्ष नितेश मालेवाल, सुरेश अंबुलगेकर, गुरुजीत सिंग खालसा, उमेश गारुडकर, अण्णा हजारे यांच्या आंदोलनात मराठवाड्यातील संघटन आणि नेतृत्व करणारे प्रा. बालाजी कोंपलवार, दैनिक प्रजावाणी चे संपादक शंतनु आणि धनंजय डोईफोडे यांनी सायकल यात्रेस हिरवा झेंडा दाखविला.
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यात्रेसाठी आपला प्रतिनिधी आणि संदेश पाठविला. रोटरी आणि लायन्स क्लबचे स्थानिक संयोजक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
किनवट ( जिल्हा नांदेड)येथे गेली तीन दशके साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून गरिबांना वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अशोक बेलखोडे यांनी यावेळी भारत जोडो सायकल यात्रेतील अनेक आठवणींना उजाळा दिला.
डॉ. बेलखोडे म्हणाले की,भारत जोडो सायकल यात्रेमुळे आपल्या देशाचे समाजमन आणि समाजस्थिती युवावस्थेत समजली. समाजाचा एक अंधारलेला कोपरा निवडून तेथे सेवा आणि ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणे म्हणजे देशभक्ती आणि देशसेवा हे स्पष्ट लक्षात आले. त्यामुळेच आपल्यासह असंख्य युवा सायकल यात्री समाजाच्या तळागाळात जाऊन प्रत्यक्ष काम करू लागले. स्नेहालयाच्या सायकल यात्रेतील कार्यकर्ते देखील या प्रेरणेतून अंधारवाटा उजळत असल्याचे डॉ.बेलखोडे आणि श्री. बाबा सूर्यवंशी यांनी नमूद केले…
*सरोपा सन्मान*
=============
हुजूर साहेब सचखंड गुरुद्वाराचे प्रमुख कुलवंत सिंग यांनी गुरुद्वारा तर्फे सायकल यात्रीचा सन्मानाचे भगवे वस्त्र म्हणजेच सरोपा देऊन सन्मान केला.
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या शास्त्र महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थाचालक यांच्यासोबत संवाद करण्यात आला.
लायन्स क्लब चालवीत असलेल्या नेत्र रुग्णालयाला यात्रा प्रतिनिधींनी भेट दिली..
पथनाट्य,संतांची भजने, प्रेरणादायक गीते, थेट लोकसंवाद अशी माध्यमे यात्रेत वापरली जात आहेत. विविध विषयात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, प्रत्यक्ष समाजात सेवाकाम करणाऱ्या महिला आणि मुली सहभागी आहेत.
सायकल यात्रेत 15 ते 79 वर्षांचे पूर्णवेळ 50 यात्री आहेत. याशिवाय प्रत्येक गावातील हौशी तरुण-तरुणी यात्रेसोबत 10 किलोमीटर सायकल चालवतात. दररोज संध्याकाळी मुक्काम असलेल्या ठिकाणच्या नागरिकांसोबत सर्वधर्म प्रार्थना यात्री करतात. जातीय आणि धार्मिक संघर्ष घडलेल्या ठिकाणी त्यांचे आयोजन करण्यात येते.
पुढील दोन दिवसात हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात सायकल यात्रेचे कार्यक्रम होत आहेत…

