गोरेगाव येथे माजी सैनिक संघटनेचा स्नेहमेळावा संपन्न
पारनेर / भगवान गायकवाड,
देशाची सेवा करून गावात परतल्यावर माजी सैनिकांनी गावातील तसेच इतर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. गोरेगाव (ता. पारनेर) येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्यात बोलताना अण्णा हजारे यांनी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नरसाळे आणि तालुकाध्यक्ष कॅप्टन विठ्ठल वराळ यांच्या संघटन कौशल्याचे विशेष कौतुक केले. या दोघांनी गोरेगाव येथे माजी सैनिकांना एकत्र आणून स्नेहसंमेलन आयोजित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी भरभरून अभिनंदन केले.कर्नल साहेबराव शेळके यांनी माजी सैनिकांना निवृत्तीनंतर रोजगार किंवा शेतीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. तसेच, सध्याच्या तरुणांनी सैन्यात मोठ्या संख्येने भरती व्हावे यासाठी मार्गदर्शन मेळावे आयोजित करत असल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच पारनेर येथे सैनिकांना सहाय्यता केंद्र उभारले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
संघटनेच्या बळकटीसाठी एकत्र या…..
माजी सैनिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे म्हणाले की, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नरसाळे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात माजी सैनिकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर सोडवले जात आहेत. या कार्याला अधिक बळ देण्यासाठी आणि संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व माजी सैनिकांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
सर्जिकल स्ट्राईकचा थरार….
यावेळी लेफ्टनंट कर्नल राजेंद्र निंभारकर यांनी सन २०१६ मधील सर्जिकल स्ट्राईकचा थरारक अनुभव कथन केला. उरी हल्ल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या संदेशानुसार, आपण पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन १० मिनिटांत सुमारे ८० अतिरेक्यांचा खात्मा केला, असे त्यांनी सांगितले.या स्नेहमेळाव्यात शहीद जवान वीरपत्नी आणि माजी सैनिकांच्या गुणवंत मुलांचा विशेष गौरव करण्यात आला. पारनेर महाविद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थिनींनी केलेले झांज पथकाचे सादरीकरण लक्षवेधी ठरले, तर नगर आर्मर कोअरच्या बॅण्ड पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाला कर्नल साहेबराव शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नरसाळे, कॅप्टन विठ्ठल वराळ, गोरेगावच्या सरपंच सुमन तांबे यांच्यासह ५०० हून अधिक माजी सैनिक, वीरपत्नी, व स्थानिक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




