राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी, पुणे अजिंक्य अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाचा पेनल्टी शूटआउटमध्ये ३-० ने पराभव


अहिल्यानगर,
जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा स्पोर्ट्स ॲकॅडमी आणि प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप २०२५ स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी, पुणे संघाने बाजी मारली. अंतिम सामन्यात त्यांनी कोल्हापूर संघाचा पराभव करून राज्य अजिंक्यपद पटकावले. आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी, पुणे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

अंतिम सामन्यात क्रीडा प्रबोधिनी, पुणे संघाने कोल्हापूर विभागावर पेनल्टी शूटआउटमध्ये ३-० ने रोमांचक विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात पुणे विभागाने नागपूर विभागाला हरवून तिसरे स्थान मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा कार्यालयातील भाऊराव वीर, महेंद्र डांगे, विखे पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार, प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या प्राचार्या विद्या घोरपडे, संस्थेचे क्रीडा अधिकारी डॉ. उत्तम अनाप आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर या आठ विभागांचे आणि क्रीडा प्रबोधिनीचा एक अशा नऊ संघांतील १४४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अभिषेक सोनवणे, अभय साळवे, अतुल डेविल्यम, राज जिरेमिया लूमट्रू यांनी सहकार्य केले.

यावेळी बोलताना डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या, “राज्यस्तरीय स्पर्धेमुळे प्रवरेच्या विद्यार्थ्यांना राज्यपातळीवर खेळाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांनी खेळातही चांगले करिअर करावे आणि राज्य तसेच देशपातळीवर पोहोचावे यासाठी प्रवरा स्पोर्ट्स ॲकॅडमीचे सहकार्य नेहमीच कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.”

ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले, “सर्व सहभागी संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजयी संघ आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.” “आता दिल्ली जिंका” अशा शुभेच्छा देत, त्यांनी प्रवरेच्या माध्यमातून दिलेल्या सुविधा खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गोडगे यांनी केले आणि प्राचार्या विद्या घोरपडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Exit mobile version