Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त; नव्या...

पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त; नव्या जोमाने संघटन उभारणीचा निर्धार : तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे


पारनेर / प्रतिनिधी, 
 पारनेर तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघणारी मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) ने तालुका कार्यकारिणी व त्याअंतर्गत काम करणाऱ्या सर्व आघाड्या थेट बरखास्त करत संघटनेत मोठाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रदेश पातळीवरून आलेल्या पक्षाच्या आदेशानुसार तालुका कार्यकारिणीसह सर्व सेलही तत्काळ बरखास्त करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आलेली मरगळ, ढिसाळ कामगिरी आणि संघटनातील सुस्ती यावर कठोर भूमिका घेत “कामगिरी नसल्यास पद नाही” असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

दरम्यान, संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक गटात एक उपाध्यक्ष देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अवघ्या आठ दिवसांत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले असून, नव्या आणि कार्यक्षम चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

हा निर्णय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर आणि खासदार निलेश लंके यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला असल्याची माहिती आहे. वरिष्ठ नेतृत्वाने संघटनेत थेट हस्तक्षेप करत पक्षाला “ॲक्शन मोड”मध्ये आणल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. गावपातळीवर बूथनिहाय बांधणी करत प्रत्येक कार्यकर्त्याला सक्रिय करण्यावर भर दिला जाणार आहे.

तसेच, या मोठ्या बदलांमुळे इतर पक्षांतील असंतुष्ट कार्यकर्त्यांचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळले असून मोठ्या प्रमाणावर प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

एकंदरीत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने घेतलेला हा निर्णय केवळ संघटनात्मक बदल नसून आगामी निवडणुकांसाठी आक्रमक सुरुवात असल्याचे स्पष्ट होत आहे. पारनेरमध्ये आता राजकारण अधिक तापणार, हे निश्चित मानले जात आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments