Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरशेतकऱ्यांच्या हक्कासाठी रुपेश ढवण यांचे निघोज येथे आमरण उपोषण

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रुपेश ढवण यांचे निघोज येथे आमरण उपोषण


निघोज, सौ. निलम खोसे पाटील, 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, कांदा भाववाढ, निर्यात धोरण आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी ‘आपली माती, आपली माणसं’ या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रुपेश ढवण यांनी निघोज येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या उपोषणाला शेतकरी, वारकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

रुपेश ढवण यांनी उपोषणापूर्वी ग्रामदैवत श्री मळगंगा देवीचे दर्शन घेतले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या महिन्यात त्यांनी यशस्वी अन्नत्याग आंदोलन केले होते, ज्याला राज्यभरातून शेतकरी आणि वारकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या आंदोलनाच्या प्रभावामुळे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष उलटूनही हे आश्वासन पूर्ण न झाल्याने ढवण यांनी पुन्हा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कांदा भाववाढ आणि बांगलादेशसह इतर देशांत कांदा निर्यात खुली करणे, शेतीमालाला हमीभाव, शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांचे तातडीने निराकरण या व इतर मागण्यासाठी उपोषण सुरू आहे.

रुपेश ढवण यांच्यासमवेत महेंद्र पांढरकर, देवराम लामखडे, पोपट तनपुरे, कचरू वरखडे, बाबाजी पठारे, दादा वराळ, संतोष लामखडे, संजय तनपुरे, अशोक शेटे, राजेंद्र वाळुंज, सोनी ताई पवार, नंदाबाई वरखडे, साखराबाई वरखडे, हिराबाई वराळ, बबिता काळे, शोभा ढवळे यांच्यासह अनेक शेतकरी साखळी उपोषणात सहभागी होत आहेत.

उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दररोज सायंकाळी 6 ते 7:15 या वेळेत हभप अशोक कानडे, तुषार गुंड महाराज, धनंजय गोरडे, बाळासाहेब पठारे, सर्जेराव मस्कर, बाबा खामकर, श्रीराम घुले, पोपट तनपुरे, श्रीहरी पवार महाराज यांचे हरिपाठ आणि प्रवचन आयोजित केले जात आहे. तसेच, विविध गावांतील भजनी मंडळांचे भजनांचे कार्यक्रम होत आहेत. रात्री 7:30 ते 8:30 या वेळेत शेतकऱ्यांच्या सहभागातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे.

या उपोषणाला तालुक्यातील शेतकरी, वारकरी, अधिकारी, डॉक्टर, पत्रकार यांच्यासह विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. अनेकांनी प्रत्यक्ष भेटी देऊन किंवा लेखी/तोंडी स्वरूपात समर्थन व्यक्त केले आहे. रुपेश ढवण यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस जाईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

आंदोलनाबाबत अधिक माहितीसाठी ‘आपली माती, आपली माणसं’ संघटनेशी संपर्क साधावा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments