पारनेर / भगवान गायकवाड,
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पारनेर येथील महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत, रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कु. योगिता तारडे हिने विद्यापीठ स्तरीय ‘अविष्कार’ पोस्टर स्पर्धेत चमकदार यश संपादन केले आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची निवड आता थेट राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी झाली आहे.
नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या या आंतर-महाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर (अहमदनगर), नाशिक आणि पुणे विद्यापीठांच्या कार्यकक्षेतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत एम. एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री) वर्गात शिकणाऱ्या योगिता तारडे हिने आपल्या संशोधनाचे प्रभावी आणि सखोल सादरीकरण करत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
यापूर्वी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत पारनेर महाविद्यालयातून योगिता तारडे (एम. एस्सी.), अक्षय आढाव (एम. एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री) आणि प्रीती लोखंडे (पी.एच.डी. वनस्पतीशास्त्र) यांची विद्यापीठ स्तरासाठी निवड झाली होती. त्यापैकी योगिताने विद्यापीठ स्तरावर बाजी मारत महाविद्यालयाचा गौरव वाढवला आहे.विद्यार्थिनीच्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “योगिताची निवड ही पारनेर महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. तिचे परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी यामुळेच हे यश शक्य झाले आहे. राज्यस्तरावरही ती नक्कीच उत्कृष्ट कामगिरी करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. तुकाराम थोपटे यांनी योगिताच्या संशोधनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “योगिताची कामगिरी ही रसायनशास्त्र विभागासाठी प्रेरणादायी आहे. तिच्या सखोल विषय ज्ञानासोबतच संशोधनाकडे पाहण्याची तिची दृष्टी विशेष लक्षणीय आहे.”योगिता तायडे हिला या यशासाठी प्रा. भाऊसाहेब नरसाळे, प्रा. आर. बी. खराडे आणि प्रा. डॉ. सरिता कुंडलीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रामचंद्र दरे यांनी विशेष अभिनंदन केले. ते म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी आमची संस्था सदैव प्रयत्नशील असते. योगिता तारडे हिचे यश हे सिद्ध करते की, योग्य मार्गदर्शन आणि परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण विद्यार्थीही राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात. तिच्या या यशाबद्दल संस्थेला सार्थ अभिमान आहे.”संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव अॕड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव श्री. मुकेश मुळे, खजिनदार अॕड. दीपलक्ष्मी म्हसे, विश्वस्त मा. आ. नंदकुमार झावरे, सिताराम खिलारी आणि डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनीही यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
योगिता तारडेच्या या यशाने पारनेर महाविद्यालयाचे नाव राज्यभर नेले असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!




