कामगारांच्या आरोग्यासाठी सामाजिक बांधिलकीतून पुढाकार
पारनेर / भगवान गायकवाड,
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे बांधकाम कामगारांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष बांधकाम कामगारांनी सहभाग नोंदवून आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घेतली.
दिवसभर चाललेल्या या शिबिरात कामगारांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, विशेषत: लिव्हर (यकृत) तपासणी आणि इतर आवश्यक चाचण्या करण्यात आल्या. केवळ तपासणीच नव्हे, तर गरजू कामगारांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. साधारणपणे ७० ते ८० कामगारांनी या वैद्यकीय सेवेचा प्रत्यक्ष लाभ घेतला. बांधकाम क्षेत्रात काम करताना होणारी शारीरिक झीज आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेता, हे शिबिर कामगारांसाठी अत्यंत दिलासादायक ठरले.या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन रेश्मा मणियार यांनी केले होते. “गावोगावी पोहोचून शेवटच्या कामगाराला वैद्यकीय सुविधा मिळवून देणे” हे ध्येय समोर ठेवून त्या कार्यरत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याप्रसंगी आरोग्य विभागाची तज्ज्ञ टीम उपस्थित होती. यावेळी सविता आढाव (जिल्हा समन्वय अधिकारी, बांधकाम कामगार ,आरोग्य विभाग,डॉ. तेजल गाडेकर, सुवर्णा, कुसुम, गायत्री व रोहित (वैद्यकीय पथक)
या टीमने अत्यंत तत्परतेने कामगारांची तपासणी करून त्यांना आरोग्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. बांधकाम कामगार हा समाजाचा असा घटक आहे जो इतरांसाठी घरे आणि इमारती उभा करतो, मात्र स्वतःच्या आरोग्याकडे त्याचे अनेकदा दुर्लक्ष होते. धुळ, ऊन आणि कष्टाचे काम यामुळे कामगारांना विविध आजारांचा सामना करावा लागतो.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
शासकीय योजना आणि अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून कामगारांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जेव्हा कामगार निरोगी असेल, तेव्हाच त्याचा परिवार आणि समाज प्रगत होईल.आपण सर्वांनी मिळून कामगार वर्गाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या जाणीवेसाठी प्रयत्नशील राहायला हवे.
– सविता आढाव
जिल्हा समन्वयक अधिकारी बांधकाम कामगार




