Friday, November 27, 2026
Google search engine
Homeअहिल्यानगरसंरक्षण मंत्र्यांसमोर अहिल्यानगरच्या विकासाचा अजेंडा; खासदार नीलेश लंके यांनी घेतली राजनाथ सिंह...

संरक्षण मंत्र्यांसमोर अहिल्यानगरच्या विकासाचा अजेंडा; खासदार नीलेश लंके यांनी घेतली राजनाथ सिंह यांची भेट


अहिल्यानगर : प्रतिनिधी, 

             अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन, संरक्षण संशोधन क्षेत्राचे बळकटीकरण आणि सैन्य हद्दीलगतच्या गावांतील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने खासदार नीलेश लंके यांनी गुरुवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी तीन स्वतंत्र निवेदने सादर करून विविध विषयांवर केंद्र सरकारच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली.

        खासदार लंके यांनी स्वदेश दर्शन २.० योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २४.९९ कोटी रुपयांच्या अहिल्यानगर किल्ला विकास प्रकल्पाची अंमलबजावणी रखडल्याकडे संरक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले. भारतीय सैन्य आणि अहिल्यानगर जिल्हा प्रशासन यांच्यातील सामंजस्य करार अद्याप पूर्ण न झाल्याने विकासकामांना सुरुवात होऊ शकलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले. हा करार तातडीने पूर्ण करून किल्ल्यावरील संवर्धन, पर्यटक सुविधा, सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांची कामे सुरू करण्यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. आगामी सिंहस्थ कुंभ २०२७ च्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास राज्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

       दुसऱ्या निवेदनात अहिल्यानगर येथील व्हीआरडीई या देशातील महत्त्वाच्या संरक्षण संशोधन संस्थेचे कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. संरक्षण संशोधन, लष्करी वाहन चाचण्या आणि स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासात अहिल्यानगरने देशपातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, प्रस्तावित संरक्षण संशोधन आणि उद्योगाशी संबंधित ‘डिफेन्स हब’ देखील अहिल्यानगरमध्येच विकसित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. हरेगाव मळा परिसरातील जमिनीबाबत प्रलंबित शेतकरी दावे आणि जमीन हक्कांचे प्रश्न निकाली काढल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेऊ नये, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले.

        तिसऱ्या निवेदनाद्वारे नगर तालुक्यातील वाकोडी, दरेवाडी, निबोडी तसेच सैन्य हद्दीलगतच्या इतर गावांतील बांधकाम परवानगी आणि अनापत्ती ना हरकत प्रमाणपत्रा संदर्भातील प्रश्न मांडण्यात आले. संरक्षण मंत्रालयाच्या २०११ आणि २०१६ मधील परिपत्रकांतील विसंगतीमुळे नागरिक, स्थानिक प्रशासन आणि सैन्य अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने नागरिकांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी संरक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या संदर्भात अद्ययावत आणि एकसंध मार्गदर्शक सूचना जारी करून नागरिकांच्या वैध मालमत्ता हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

       भेटीदरम्यान खासदार लंके यांनी अहिल्यानगरच्या विकासाशी संबंधित हे तिन्ही विषय प्राधान्याने मार्गी लावण्याची विनंती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली. या विषयांवर संरक्षण मंत्रालयाने सकारात्मक निर्णय घेतल्यास ऐतिहासिक वारसा संवर्धन, संरक्षण संशोधन, पर्यटन विकास आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments