पारनेर / प्रतिनिधी :
“गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…” या जयघोषाने कामोठे परिसर दुमदुमला आणि मुंबईच्या भूमीत पारनेरकरांच्या एकजुटीचा बुलंद आवाज घुमला. पारनेरकर रहिवासी संघ (मुंबई स्थित) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांच्या भव्य दहीहंडी उत्सवाचा आठवा सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रंगतदार उपस्थितीत पार पडला. सेक्टर ३६ येथील श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिराच्या प्रांगणात पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याला कामोठेसह मुंबई, नवी मुंबई, पनवेल तसेच परिसरातील पारनेरकर बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
पारनेर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील अनेक कुटुंबे नोकरी, उद्योग आणि व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई, पनवेल आणि रायगड परिसरात स्थायिक झाली आहेत. शहर बदलले, जीवनशैली बदलली, मात्र आपल्या गावच्या मातीशी आणि संस्कृतीशी असलेली नाळ कायम ठेवण्याचे काम पारनेरकर रहिवासी संघ सातत्याने करीत आहे. त्यामुळे दहीहंडीचा हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव न राहता पारनेरकरांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकजुटीचा उत्सव ठरला.
यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे महिला पथकाची मानाची दहीहंडी. महिलांना पारंपरिक चौकटीबाहेर येऊन आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ देत संघाने महिला सहभागाला प्रोत्साहन दिले. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर सुश्राव्य भजन, संगीत कार्यक्रम, विविध सांस्कृतिक उपक्रम आणि सायंकाळच्या भव्य आर्केस्ट्राने संपूर्ण परिसर उत्सवमय करून टाकला.
सकाळी दहीहंडी पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरातील विविध गोविंदा पथकांनी सलामी देत मानवी मनोरे रचण्यास सुरुवात केली. उंचच उंच थर रचताना गोविंदांनी दाखविलेल्या चपळाई, धाडस आणि संघभावनेने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. या स्पर्धेत शिवप्रेरणा गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला, राजे शिवाजी स्पोर्ट्स क्लबने द्वितीय क्रमांक मिळविला, तर आई-बाबा पथक कामोठेने तृतीय क्रमांक मिळविला. सहभागी गोविंदा पथकांचा पारनेरकर रहिवासी संघाच्या वतीने बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या सोहळ्यास पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर, आमदार प्रशांत ठाकूर, सभापती रवींद्र जोशी, विकासदादा घरत, कामोठे मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील, राहुल पाटील शिंदे, प्रशांत गायकवाड, वसंत छडे, विजुभाऊ औटी, सचिन पाटील वराळ, दत्ता कुलट, नगरसेवक भाऊ भगत, मेघना गाडगे, सागर पाटील यांच्यासह सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. दहीहंडी पूजन धनराज विसपुते, शामसुंदर कुलथे, ज्योती देशमुख, पोलीस निरीक्षक कामोठे तसेच मोहन पवार, पोलीस उपनिरीक्षक कामोठे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार काशिनाथ दाते म्हणाले की, पारनेर तालुक्यातील हजारो कुटुंबे रोजगार, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई-नवी मुंबईच्या भूमीत आली असली तरी आपल्या मातीशी असलेले नाते आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान त्यांनी कधीही सोडलेला नाही. पारनेरकर रहिवासी संघाचा दहीहंडी उत्सव त्याचेच उत्तम उदाहरण आहे. दहीहंडी हा केवळ श्रीकृष्ण भक्तीचा उत्सव नसून संघभावना, परस्पर सहकार्य, धाडस आणि एकजुटीचा संदेश देणारा उत्सव आहे. आज या ठिकाणी एकत्र आलेली पारनेरकरांची मोठी उपस्थिती ही त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेची साक्ष आहे. ही एकजूट भविष्यात समाजहिताच्या आणखी मोठ्या कामांसाठी उपयोगी पडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पारनेरकर रहिवासी संघाच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट यांना श्रद्धास्थान आणि पद्मभूषण अण्णा हजारे यांना प्रेरणास्थान मानून सामाजिक बांधिलकीची भावना जपण्याचा संघाचा प्रयत्न आहे. मुंबईच्या धावपळीच्या जीवनातही आपल्या गावची परंपरा, सण-उत्सव आणि आपली माणसं यांना एकत्र आणण्याचे काम संघाच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे या दहीहंडी उत्सवाला पारनेरकरांच्या भावनिक एकजुटीचे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष भाऊशेठ पावडे, कार्याध्यक्ष कुंडलिकशेठ वाफारे, सचिव कृष्णाशेठ ढोमे, उपाध्यक्ष दिलीपशेठ घुले, सहसचिव संजयशेठ आहेर यांच्यासह मनोज कवडे, महादेवशेठ पुंडे, धनंजयशेठ निमसे, शुभम वाफारे, जालिंदरशेठ खोसे, सबाजीशेठ जराड, गणेश गुंड, प्रशांत ठुबे, अमोल डोंगरे, अक्षय मगर, विलास लांडगे, तुषार लांडगे, डॉ. सिताराम गुंड, माऊली तांबोळी, अश्विन गायखे, बन्सी पागिरे, एकनाथ लामखडे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुंबईच्या गर्दीत पारनेरची ओळख जपणारा, हजारो कुटुंबांना एकत्र आणणारा आणि नव्या पिढीला आपल्या मातीशी जोडणारा हा दहीहंडी सोहळा पारनेरकरांच्या संघटित शक्तीचा जागर ठरला. नोकरी-व्यवसायासाठी शहराच्या कितीही दूर गेलं तरी मातीची ओढ आणि माणसांची नाळ कधी तुटत नाही, हे या सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले. “वारसा संस्कृतीचा… पारनेरकरांच्या एकजुटीचा!” या भावनेतून साजरा झालेला हा दहीहंडी उत्सव पारनेरकरांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक एकतेचा अविस्मरणीय अध्याय ठरला.
🔶🔶🔶🔶🔶🔶
▪️पारनेरचे कामदार आमदार काशिनाथ दाते सर यांनी गेल्यावर्षी दहीहंडी उत्सवात दिलेला मौलिक सल्ला आम्ही मनापासून स्वीकारला आणि तालुक्याची एकी दाखविण्यासाठी सर्वांनी राजकीय झेंडे बाजूला ठेवून एकाच दहीहंडीच्या माध्यमातून एकत्र यावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले. कामोठेला ‘मिनी पारनेर’ म्हणून ओळखले जाते; त्यामुळे पारनेरकरांची मजबूत संघटना उभी करण्याची ही संधी आम्हाला महत्त्वाची वाटत होती. मात्र, आमच्याकडून एकजुटीसाठी प्रामाणिक प्रयत्न करूनही समोरून अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही, याची खंत आहे. भविष्यातही राजकीय मतभेद बाजूला ठेवून पारनेरकरांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावे, हीच आमची भूमिका आहे.
– संजय आहेर (सचिव, पारनेरकर रहिवाशी संघ दहीहंडी उत्सव समिती)



