पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथील सुपुत्र, लेखक- दिग्दर्शक रामदास महादेव तांबे यांनी साकारलेला ‘पत्रावळ’ हा लघुचित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत असून, चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण लघुचित्रपट महोत्सव २०२६ मध्ये या चित्रपटाला ‘लक्षवेधी लघुचित्रपट’ हा मानाचा पुरस्कार सिने सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे, जेष्ठ अभिनेते जयंत ओक आणि अभिनेते सुचित जाधव यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले आहे. त्यांच्या या यशामुळे पारनेर तालुक्याच्या कला व सांस्कृतिक क्षेत्राच्या यशात मोठी भर पडली आहे.
‘पत्रावळ’ हा लघुचित्रपट केवळ एक कलाकृती नसून ग्रामीण वास्तव, सामाजिक जाणीवा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा संगम घडवण्यासाठी केलेला प्रभावी प्रयत्न आहे. एका साध्या, अशिक्षित पण निसर्गप्रेमी व्यक्तीच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा समाजाला अंतर्मुख करणारी आहे. गावोगावी फिरत विविध समारंभात वापरल्या जाणाऱ्या पानांपासून तयार होणाऱ्या पत्रावळींचा व्यवसाय करताना तो व्यक्ती केवळ उदरनिर्वाह करत नाही, तर नकळत पर्यावरण रक्षणाचे मोठे कार्य करत असतो, हा या चित्रपटाचा गाभा आहे. प्रमुख भूमिका डॉ. सुरेश शिंदे,सहाय्यक भूमिका डॉ. वर्षा बांडे, राहुल बरडे, ध्वनी किरण गावडे संकलन अमेय गावडे, छायाचित्रण सोमेश थोरात, ग्राफिक्स वैष्णवी तांबे, लेखन दिग्दर्शन रामदास तांबे निर्माता किरण गावडे, रामदास तांबे, सौजन्य माळकूप आणि भाळवणी ग्रामस्थ यांचे आहे.
या कथानकातून आजच्या आधुनिक आणि यांत्रिकीकरणाच्या युगात हरवत चाललेली साधी जीवनशैली, निसर्गाशी असलेले नाते आणि समाजासाठी निस्वार्थ भावनेतून केले जाणारे छोटेसे कार्य किती मोठा परिणाम घडवू शकते, याचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि त्यावर पर्याय म्हणून पारंपरिकता जपत वापरल्या जाणाऱ्या ‘पत्रावळ’सारख्या साधनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या लघुचित्रपटात कोणत्याही कृत्रिम तांत्रिक साधनांचा अतिरेक न करता, नैसर्गिक अभिनय, वास्तवदर्शी चित्रण आणि प्रभावी पार्श्वसंगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे ही कलाकृती अधिक वास्तववादी आणि हृदयस्पर्शी ठरते.
🔶🔶🔶🔶🔶🔶
रामदास तांबे यांचे यश हे केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण पारनेर तालुक्याचा अभिमान आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी आपल्या कलेच्या जोरावर मोठ्या व्यासपीठावर पोहोचणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. ‘पत्रावळ’सारख्या लघुचित्रपटातून सामाजिक जाणीवा जागृत करण्याचा प्रयत्न दिसून येतो, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आजच्या डिजिटल युगात लघुचित्रपट हे प्रभावी माध्यम बनले आहे. अशा माध्यमातून समाजाला योग्य दिशा देणारे विचार मांडणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. रामदास तांबे यांनी भविष्यातही असेच दर्जेदार आणि आशयघन चित्रपट साकारावेत, यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
– आमदार काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)



