महिला हा समाजाचा आधारस्तंभ; सरपंच विमलताई झावरे यांनी मांडली सक्षमीकरणाची भूमिका.
पारनेर/प्रतिनिधी :
महिला हा समाजाचा खऱ्या अर्थाने मुख्य आधारस्तंभ आहे आणि तिला समाजामध्ये योग्य सन्मान मिळणे ही काळाची गरज आहे. महिला सक्षमीकरण ही केवळ संकल्पना न राहता ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. असे मत वासुंदे गावच्या सरपंच विमलताई झावरे यांनी व्यक्त केले.
वासुंदे ग्रामपंचायत अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेले विशेष मार्गदर्शन शिबिर शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन वासुंदे गावच्या सरपंच विमलताई झावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वासुंदे येथील महिला अंगणवाडी सेविका, वैद्यकीय मदतनीस तसेच पारनेर शहरातील शिक्षण शास्त्र विद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या विशेष शिबिरामध्ये महिलांच्या दैनंदिन जीवनातील विविध प्रश्नांवर आणि समस्यांवर सविस्तर चर्चा व विनिमय करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी पारनेर येथील रूपवर्षा भालेराव, प्रियांका भामरे, पार्वती कारंडे, सुप्रिया गोरे, करिष्मा शेख, अपेक्षा जऱ्हाड, अश्विनी रोहकले यांच्यासह वासुंदे परिसरातील अनेक महिला भगिनी व युवती उपस्थित होत्या. विमलताई झावरे यांचे महिलांच्या उन्नतीसाठी सुरू असलेले सामाजिक काम हे इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरपंच विमलताई झावरे म्हणाल्या की, आजची स्त्री ही घराचा गाडा चालवण्यासोबतच सामाजिक जबाबदारीही समर्थपणे पेलत आहे. महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. वासुंदे ग्रामपंचायत नेहमीच महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, आगामी काळातही महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील. जोपर्यंत महिला आर्थिक आणि वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत समाजाची खरी प्रगती होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
🔶🔶🔶🔶🔶
ग्रामपंचायतीचे उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी
वासुंदे ग्रामपंचायत दरमहा महिलांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्या सुप्रियाताई झावरे व सुजितराव झावरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करत असते. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सरपंच विमलताई झावरे गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या उन्नतीसाठी सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, ज्याचे कौतुक संपूर्ण परिसरात होत आहे.



