पारनेर / भगवान गायकवाड,
विद्यार्थ्यांनी जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न यांची सांगड घालत अभ्यास केला तर यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन नुकतेच भारतीय वन सेवेत निवड झालेले अभिजीत आहेर यांनी वार्षिक उद्बोधन वर्ग व आंतरराष्ट्रीय युवा दिना निमित्त ‘यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष व्याख्यानाचे आयोजन दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक अभिजीत आहेर यांचा विशेष सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला.
ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षेमध्ये केवळ जास्त मार्क्स मिळालेले विद्यार्थीच यश प्राप्त करू शकतात असे नाही. नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि प्रामाणिक प्रयत्न यांची जोड दिली तर हमखास यश मिळू शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भाषेचा न्यूनगंड न बाळगता आपल्या रोजच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत आपले व्यक्तिमत्व अधिकतम घडवावे. तुमचा रोजचा संघर्ष तुमच्या पंखांना ताकद देऊ शकतो, त्यामध्ये रंग भरू शकतो आणि त्यातूनच एक सुंदर फुलपाखरू जसे तयार होते त्याप्रमाणे ध्येय ठरवून प्रामाणिक प्रयत्न केले तर निश्चितच तुमचे नशीब बदलेल. या ओघाने कुटुंबाचा समाजाचा आणि देशाचा उद्धार होईल. मोबाईल मधून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सकारात्मक गोष्टींकरता व अभ्यासा करिता केला तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश आहेर यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजने बद्दल सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयीन जीवनामध्ये तसेच समाज जीवनामध्ये वावरताना राष्ट्रीय सेवा योजना आपल्याला पदोपदी सहाय्य करते हे सांगत महत्त्व विशद केले. तसेच, पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे आयसीटीसी चे अध्यक्ष श्री. विकास वाळुंज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सांगितले की युवकांनी आपले आरोग्य सांभाळावे. तरुणांनी आपली शक्ती सकारात्मक कामांसाठी वापरून ध्येयप्राप्ती करावी. समाजामधील एड्स बद्दलचे गैरसमज दूर करावेत आणि एड्स बद्दल जनजागृती करून विकासामध्ये हातभार लावावा. तसेच अवयवदाना बद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात. परंतु, फार कमी त्यामध्ये यशस्वी होतात. पारनेर तालुक्यातील पळसपुर सारख्या ग्रामीण भागातील अभिजीत सारखा विद्यार्थी आपल्या परिश्रमातून सर्वात अवघड अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादित करतो, ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. रानफुलांसारखं खडतर परिश्रमा घेऊन आपलं व्यक्तिमत्व फुलवणं फार महत्त्वाचा आहे. कोविडच्या काळामध्ये महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राचा उपयोग जसा अभिजीतने अभ्यासासाठी केला, तसाच उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. प्रयत्नवादी रहा परिश्रम करा आणि उंच भरारी घ्या, यासाठी महाविद्यालय सदैव आपल्या पाठीशी राहील आणि चांगले यश संपादन करा.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रवींद्र देशमुख, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, सर्व शाखाप्रमुख, विभाग प्रमुख व प्राध्यापक वृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. हनुमंत गायकवाड यांनी केले. परिचय व सूत्रसंचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. माया लहारे यांनी केले.




