Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरधर्मवीरांच्या जाज्वल्य इतिहासातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी; खा. नीलेश लंके यांचे प्रतिपादन

धर्मवीरांच्या जाज्वल्य इतिहासातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी; खा. नीलेश लंके यांचे प्रतिपादन


पारनेरमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात

पारनेर : प्रतिनिधी, 

            पारनेर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. खासदार नीलेश लंके यांच्या कार्यालयासमोर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

         यावेळी उपस्थित शिवभक्तांनी जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.

कार्यक्रमात बोलताना खासदार नीलेश लंके यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव करत त्यांच्या चरित्रातून तरुणांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ सिंहासनाचे वारस नव्हते, तर स्वराज्याच्या अस्मितेसाठी प्राणार्पण करणारे तेजस्वी सूर्य होते. औरंगजेबासारख्या बलाढ्य सत्तेसमोर त्यांनी कधीही मस्तक झुकवले नाही. संकटांशी संघर्ष करत स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते, असे खा. लंके म्हणाले.

          ते पुढे म्हणाले की, संभाजीराजे हे लहानपणापासूनच विद्वान, धैर्यवान आणि पराक्रमी होते. संस्कृत, फारसी, अरबीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्यावर मोठे संकट आले असताना संभाजीराजांनी न डगमगता तब्बल नऊ वर्षे मुघलांविरुद्ध संघर्ष केला. बुरहानपूरवरील मोहिम, विविध किल्ल्यांवरील विजय आणि स्वराज्य रक्षणासाठी दिलेला लढा हा इतिहासातील सुवर्ण अध्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
संभाजीराजे हे केवळ योद्धे नव्हते, तर साहित्यिक आणि धर्मरक्षकही होते, असे नमूद करत खा. लंके म्हणाले, ‘बुधभूषण’सारखे संस्कृत काव्य त्यांनी लिहिले. धार्मिक सहिष्णुता जपत सर्व धर्मीयांना समान वागणूक दिली. मात्र औरंगजेबाच्या विश्वासघातकी कारस्थानामुळे त्यांना कैद करण्यात आले आणि अमानुष छळ करून हत्या करण्यात आली. तरीही त्यांच्या बलिदानाने मराठा साम्राज्याची ज्योत अधिक प्रखर झाली.

        आजच्या तरुणांनी संभाजीराजांच्या शौर्य, त्याग आणि सत्यनिष्ठेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाज आणि राष्ट्रासाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मातृभाषा मराठीचा अभिमान जपत स्वराज्याचा विचार पुढे नेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

      यावेळी खा. लंके यांचे ज्येष्ठ बंधू दीपक (आण्णा) लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनशेठ भालेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप सालके, संचालक रा. या. औटी, मारुतराव रेपाळे, नगरपंचायत सदस्य, विविध गावांचे सरपंच-उपसरपंच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी, निलेश लंके प्रतिष्ठान, आपला मावळा संघटनेचे कार्यकर्ते तसेच पारनेर शहरातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments