नेप्तीत ६९ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण



पारनेर / ता. प्रतिनिधी,

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील ४३ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण स्वतः लक्ष घालून शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत २० ते २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. नगर तालुक्याच्या विकासाला आपण सातत्याने प्राधान्य दिले असून, विकासकामांच्या बाबतीत कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, यापुढेही गावागावांतील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार काशिनाथ दाते सर यांनी नेप्ती येथिल ६९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी दिली.

नेप्ती गावातील रस्ते व पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या सहा विकासकामांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये कल्याण बायपास ते बाबासाहेब होळकर घर रस्ता (१० लाख), पोपट जपकर घर ते बाबासाहेब होळकर घर रस्ता (१० लाख), नेप्ती बायपास रस्ता सुधारणा (१८ लाख), स्मशानभूमी ते सय्यद वस्ती रस्ता सुधारणा (१८ लाख), राम मा-६१ ते रावळे वस्ती रस्ता (५ लाख) आणि कृष्णवाडी रस्ता (८ लाख) या कामांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना आमदार दाते सर यांनी नगर तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. सोनेवाडी येथे नुकत्याच झालेल्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाचा तसेच विधानसभा निवडणुकीनंतर हिंगणगाव येथे एक कोटी रुपयांच्या निधीतून मार्गी लावलेल्या विकासकामांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. नगर तालुक्यातील कार्यकर्ते विकासकामांच्या बाबतीत समाधानी असून, लोकांच्या अपेक्षेनुसार विकासाचा हा प्रवास यापुढेही सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव होळकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत दादा गायकवाड, माजी सरपंच विठ्ठल जपकर, सरपंच सविता संजय जपकर, उपसरपंच बंडू जपकर, उद्योजक बापू सोनवणे, माजी सरपंच संजय जपकर, उद्योजक संजय जपकर, चेअरमन उमर सय्यद, व्हा. चेअरमन भाऊसाहेब होळकर, माजी उपसरपंच बाबासाहेब होळकर, माजी चेअरमन अशोक जपकर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जपकर यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
▪️ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या नगर तालुक्यातील ४३ गावांमध्ये पारनेरच्या बरोबरीने किंबहुना त्याहूनही अधिक प्रमाणात विकासकामे होत असल्याचे मोठे समाधान आहे. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून प्रथमच एखाद्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नगर तालुक्यातील गावांना विकासकामांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने न्याय मिळत असून, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आ. दाते सर यांच्या कामाच्या झपाट्यामुळेच त्यांची संपूर्ण मतदारसंघात ‘कामाचा माणूस’ अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. नेप्ती गावातील विकासकामांचा हाच वेग कायम राहिला, तर आगामी तीन वर्षांत गावातील एकही रस्ता विकासकामांपासून वंचित राहणार नाही, असा मला ठाम विश्वास आहे.

– अरुणराव होळकर, माजी जि.प. सदस्य अहिल्यानगर
Exit mobile version