“‘I Love You’ नंतर काय? — तरुणांनी जाणून घ्यायलाच हवं” – अल्पवयीन प्रेमाची कठोर वास्तवकथा…!


एका छोट्याशा शहरात दोन कुटुंबं राहत होती. दोन्ही कुटुंबं साधी, कष्टाळू आणि आपल्या मुलांवर मनापासून प्रेम करणारी. पण एक गोष्ट दोघांमध्ये समान होती — “आपल्या मुलांबाबत असं काही होणारच नाही” हा ठाम विश्वास. आणि अनेक कथा इथूनच सुरू होतात… विश्वासातून, पण पूर्वतयारीशिवाय.

स्नेहा दहावीत शिकत होती. तिच्या आई-वडिलांनी तिला उत्तम शिक्षण, क्लासेस, मोबाईल आणि इंटरनेट दिलं होतं. पण एक गोष्ट मात्र दिली नव्हती — मोकळा संवाद. “प्रेम-व्रेम वाईट असतं”, “मोबाईलवर जास्त बोलायचं नाही”, “आपण संस्कारी आहोत” — एवढंच तिला शिकवलं गेलं. पण कोणी शांतपणे बसून सांगितलं नव्हतं की, एखादा मुलगा तुला ‘I love you’ म्हणेल, लग्नाचं स्वप्न दाखवेल, जवळीक साधायचा प्रयत्न करेल — तेव्हा कसं विचार करायचं? कसं थांबायचं? आणि सर्वात महत्त्वाचं — अडचण आली तर आधी घरी कसं सांगायचं?

दुसऱ्या बाजूला आदित्य होता. वय एकोणीस. त्याला घरच्यांनी स्वातंत्र्य दिलं होतं — मोबाईल, बाइक, मित्रमंडळी. “करिअर कर, पुढे जा” एवढीच शिकवण मिळाली. पण अल्पवयीन मुलीसोबत नातं ठेवताना कायद्याची मर्यादा काय असते, हे कोणी स्पष्ट केलं नव्हतं. त्याच्या पालकांनाही खात्री होती — “आपला मुलगा समजूतदार आहे.” त्यांनी विश्वास ठेवला, पण मार्गदर्शन केलं नाही.

एक दिवस शाळेबाहेर दोघांची ओळख झाली. मैत्री वाढली. आणि एक संध्याकाळी स्नेहाने हसतच म्हटलं, “I love you.” त्या क्षणी आदित्यच्या मनात एखाद्या चित्रपटासारखं दृश्य उभं राहिलं. त्याच्या डोक्यात जणू डायलॉग घुमला — “जब प्यार किया तो डरना क्या!” त्यानेही उत्तर दिलं, “मी सुद्धा.” दोघांनाही वाटलं — हीच खरी दुनिया आहे.

सुरुवातीला सगळं गोड होतं. मेसेज, कॉल, इमोजी, गुपचूप भेटी. पण या गोड क्षणांच्या मागे एक कठोर वास्तव उभं होतं — स्नेहा अजून १८ वर्षांची नव्हती. कायद्याच्या भाषेत ती “बालक” होती. आणि भारतात Protection of Children from Sexual Offences Act हा कायदा अल्पवयीन मुला-मुलींचं संरक्षण करण्यासाठी कठोरपणे लागू आहे. या कायद्यानुसार अल्पवयीन मुलीची संमती कायदेशीर मान्य नसते. म्हणजेच तिच्यासोबत लैंगिक स्वरूपाची जवळीक, संबंध किंवा अशा उद्देशाने केलेली कृती हा गंभीर गुन्हा ठरू शकतो — भावना काहीही असल्या तरी.

एक दिवस स्नेहाच्या घरी तिचे मेसेज दिसले. घरात वादळ आलं. राग, अश्रू, अपमान. “आमची नाचक्की केलीस!” हे शब्द स्नेहाच्या मनाला जखम करून गेले. तिचा मोबाईल काढून घेतला गेला. संवाद थांबला. त्या क्षणी तिला वाटलं — “माझे आई-वडील माझे शत्रू आहेत.” आणि हट्टीपणा वाढला.

दरम्यान, आदित्यला मित्रांकडून समजलं की ही गोष्ट कायदेशीरदृष्ट्या गंभीर आहे. त्याने थोडं मागे हटायचा प्रयत्न केला. पण स्नेहा भावनिक झाली. “तुझ्यात हिंमत नव्हती तर प्रेम का केलंस?” “तू मला सोडलंस तर मी काहीतरी करून दाखवेन!” हे शब्द ऐकून तो गोंधळला. भावनेत, भीतीत आणि अपराधीपणात घेतलेला निर्णय — दोघांनी घर सोडलं.

चित्रपटात इथून पुढे गाणं लागलं असतं. पण वास्तवात पोलीस स्टेशन लागलं. तक्रार दाखल झाली. अपहरण आणि लैंगिक गुन्ह्याच्या कलमांखाली प्रकरण नोंद झालं. आदित्यला अटक झाली. “तीनेच मला बोलावलं होतं” हा त्याचा युक्तिवाद निष्फळ ठरला. कारण कायदा भावना नाही, वय पाहतो.

या कथेत कोणीही मुळात वाईट नव्हतं. चूक होती — संवादाची कमतरता, कायद्याचं अज्ञान आणि भावनेत घेतलेला उतावळा निर्णय. जर स्नेहाच्या आईने आधीच तिला समजावलं असतं की प्रेमाची मागणी आली तर घाबरू नकोस, आधी बोल; जर आदित्यच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं असतं की अल्पवयीन मुलीसोबत कोणतीही लैंगिक जवळीक गुन्हा ठरू शकते — तर कदाचित ही कथा वेगळी असती.

या कथेतून एक साधा पण महत्त्वाचा संदेश मिळतो — प्रेम चुकीचं नाही, पण वेळ आणि कायद्याची जाणीव नसलेलं प्रेम धोकादायक ठरू शकतं. “हीरो” बनण्याच्या प्रयत्नात आयुष्य “केस नंबर” बनू नये, याची काळजी घ्यावी लागते.

पालकांनी भीती नव्हे तर माहिती द्यावी. “असं केलंस तर संपलास” एवजी “अडचण आली तर आधी मला सांग” असं सांगावं. मुलींना शिकवावं की प्रेम म्हणजे दबाव नाही. मुलांना शिकवावं की “नाही” म्हणणं ही कमजोरी नाही. कायदा शत्रू नाही; तो संरक्षणासाठी आहे. पण त्याची माहिती नसेल तर तोच कठोर वाटतो.



स्नेहा आणि आदित्य ही फक्त नावं आहेत. कथा मात्र आपल्या आसपास रोज घडते. थोडा संवाद, थोडी जागरूकता आणि थोडा संयम — इतकंच पुरेसं असतं एखादं भविष्य वाचवायला.
—
लेखक…✍️
प्रविण कदम
प्रकल्प व्यवस्थापक
स्नेहालय उडान प्रकल्प, अहिल्यानगर
मो. 9011026495
Exit mobile version