Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeचोंभूत‘आनंद महोत्सव-२०२६’ चोंभूत ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम! १ जून रोजी ३०० ज्येष्ठ नागरिकांचा...

‘आनंद महोत्सव-२०२६’ चोंभूत ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम! १ जून रोजी ३०० ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सामूहिक वाढदिवस

पारनेर / भगवान गायकवाड, 
    बदलत्या काळात कौटुंबिक आणि सामाजिक मूल्ये जपण्याचा एक आदर्श वस्तूपाठ चोंभूत येथील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातील अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी समस्त चोंभूत गावकऱ्यांच्या वतीने सोमवार, दिनांक १ जून २०२६ रोजी आनंद महोत्सव – २०२६’ अंतर्गत एका भव्य “ज्येष्ठ नागरिक सामूहिक वाढदिवस सोहळ्याचे”आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा चोंभूत येथील हनुमान मंगल कार्यालय येथे सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत संपन्न होणार आहे.आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा घरातील ज्येष्ठ पिढी एकाकी पडत असल्याचे चित्र दिसते. या पार्श्वभूमीवर, “तुम्ही अजूनही समाजाचा अत्यंत महत्त्वाचा आणि आदरणीय भाग आहात,” हा विश्वास ज्येष्ठ नागरिकांच्या मनात निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस १ जून रोजी किंवा संपूर्ण जून महिन्यात आहेत, अशा सर्व आजी-आजोबांना एकत्र आणून हा सोहळा साजरा केला जाणार आहे. हा उपक्रम केवळ एक वाढदिवस नसून, गावातील एकोपा आणि कौटुंबिक भावना दृढ करणारा एक कौतुकास्पद सामाजिक संदेश आहे.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होईल. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ह.भ.प. सचिन महाराज खामकर यांचे सुश्राव्य हरी कीर्तन आयोजित करण्यात आले आहे, ज्यामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक जोड मिळणार आहे. कीर्तनानंतर सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत सामूहिक ‘केक कटिंग’ करून अभिष्टचिंतन केले जाईल. त्यानंतर भव्य सत्कार सोहळा पार पडेल, ज्यामध्ये सर्व वृद्धांना सन्मानपूर्वक धार्मिक भेटवस्तूंचे वितरण केले जाणार आहे. या आनंदाचे क्षण कायमस्वरूपी स्मरणात राहावे म्हणून प्रत्येक कुटुंबासोबत खास फोटो शूटची व्यवस्था करण्यात आली असून, कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने (महाप्रसाद) होईल. “ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे आणि संस्कृतीचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अनुभवांची शिदोरी नव्या पिढीला मार्गदर्शक ठरते. त्यांना सन्मान देणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे.”हा कौटुंबिक व सामाजिक सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त चोंभूत ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. या अनोख्या आनंदोत्सवाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन चोंभूत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments