टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी,
उच्च शिक्षण हे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असले पाहिजे जे की माणसाला माणूस म्हणून जगण्याचे तत्व शिकवेल असे प्रतिपादन डॉ. माहेश्वरी गावित यांनी केले त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “एकात्म मानवदर्शन” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, श्री ढोकेश्वर महाविद्यालय, टाकळी ढोकेश्वर व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त मा. श्री. सिताराम खिल्लारी उपस्थित होते. विद्यार्थी हा वाचनापासून दूर चालला आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे असे मत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले .
प्रमुख वक्त्या म्हणून हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर येथील प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर यांनीही व्यक्तीच्या मन, शरीर, बुद्धी आणि आत्मा यांचा एकत्रित समन्वय म्हणजे मानवाच्या व्यक्तिमत्वाचा विकास आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी डॉ. माहेश्वरी गावित यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या “एकात्म मानवदर्शन” या तत्त्वज्ञानाचा सविस्तर उहापोह करताना भारतीय संस्कृतीतील समतोल विकास, सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबन यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून विषयाची अधिक सखोल माहिती करून दिली.
कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षेकेत्तर सेवक व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारसरणी व सामाजिक जाणीव अधिक दृढ होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. लक्ष्मण कोठावळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. संकेत ठाणगे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. नामदेव वाल्हेकर यांनी व्यक्त केले.



