महिलांना ‘लखपती’ बनवण्याचा निर्धार

पारनेर / भगवान गायकवाड, 
     पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी पारनेर तालुक्यातील आदर्श गाव करंदी येथे ‘पाणी फाउंडेशन’ व ‘कृषी विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मळगंगा महिला सेंद्रिय शेती गट आणि करंदी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ‘दशपर्णी अर्क निर्मिती’ व ‘माती परीक्षण’ विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, उमेदच्या अधिकारी स्वप्नाली तोडमल, पाणी फाउंडेशनचे निवृत्ती विधाते, कृषी विभागाच्या पठारे, करंदीच्या लोकनियुक्त सरपंच नंदा भास्कर गव्हाणे व उपसरपंच अर्जुन ठाणगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    विश्व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सरपंच नंदा गव्हाणे यांच्या हस्ते गावामध्ये चिंच आणि पाम वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी बोलताना सरपंच गव्हाणे यांनी सांगितले की, केवळ आजच नव्हे, तर भविष्यात गावातील प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून करंदी गाव हरित करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.



कार्यक्रमात उपस्थित गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी सेंद्रिय शेती करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देताना, त्यांच्या शेतीविषयक सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच, उमेदच्या अधिकारी स्वप्नाली तोडमल यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मुद्दा मांडला. प्रत्येक महिलेला घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला ‘लखपती’ बनवण्याचा मानस असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मळगंगा सेंद्रिय शेती गटाच्या अध्यक्षा सुवर्णा एकविरे, विमल चौधरी, मनीषा ठाणगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पाटीलबा ठाणगे, भाऊसाहेब गांगड, गणेश चौधरी, अलका केदार, सोनाली चौधरी, भूषण थोरात, ललिता पिंपरकर, भास्कर गव्हाणे,लता ठाणगे, सिंधूबाई ठाणगे आदींची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना तंटामुक्ती अध्यक्ष राधुजी ठाणगे यांनी केली, तर सावळेराम ठाणगे, जिजाभाऊ थोरात, लखन ठाणगे आणि संतोष थोरात यांनी विशेष सहकार्य केले. शेवटी ग्रामपंचायत अधिकारी ओल्विन शेक्सपियर यांनी उपस्थित मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानले. या उपक्रमामुळे करंदी गावातील शेती आणि महिला सक्षमीकरणाला एक नवी दिशा मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed