सौ. डॉ. शुभांगी घाडगे यांना “उत्कृष्ट कृषि विस्तारक पुरस्कार” प्रदान
पारनेर / प्रतिनिधी,
कासारे गावच्या सर्वांगीण विकासात सौ. डॉ. शुभांगी घाडगे यांचे योगदान मोलाचे ठरले आहे, असे गौरवोद्गार गावचे सरपंच श्री. शिवाजीराव निमसे यांनी काढले. नुकतेच डॉ. शुभांगी घाडगे यांना महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या हस्ते “उत्कृष्ट कृषि विस्तारक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव कार्य, शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण जागरूकता, मार्गदर्शन आणि विशेषतः महिला शेतकरी सक्षमीकरणातील योगदानाची पावती आहे.
सरपंच शिवाजीराव निमसे यांनी सांगितले की, डॉ. शुभांगी मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे कासारे गावात शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब वाढला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती आणि जलसंरक्षण यासारख्या विषयांवर सातत्याने प्रशिक्षण दिले. यामुळे गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून, महिला शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
डॉ. घाडगे यांनी गावातील शेतकरी बांधवांना केवळ तांत्रिक ज्ञानच दिले नाही, तर त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे गावात कृषी आधारित लघुउद्योगांना चालना मिळाली आहे. सरपंच निमसे यांनी पुढे सांगितले की, “डॉ. मॅडम यांच्या प्रेरणेने गावात लोकसहभागातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यांचा हा पुरस्कार आमच्या गावासाठी अभिमानास्पद आहे.”
हा सन्मान डॉ. शुभांगी घाडगे यांच्या कार्याला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास सरपंचांनी व्यक्त केला. त्यांच्या या यशाबद्दल कासारे गावातील शेतकरी बांधव, महिला बचत गट आणि ग्रामवासीयांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
डॉ. शुभांगी घाडगे यांना या गौरवप्राप्तीसाठी कासारे गावाकडून हार्दिक शुभेच्छा!




