Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरकिसान संकुलात डॉ. रफिक सय्यद यांचे प्रबोधनात्मक आध्यात्मिक प्रवचन

किसान संकुलात डॉ. रफिक सय्यद यांचे प्रबोधनात्मक आध्यात्मिक प्रवचन


जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!


पारनेर / भगवान गायकवाड, 

     माणसाने आपल्या जीवनाचे खरे सार वेळीच जाणून घेतले पाहिजे. आपण या जगात जे काही पेरतो, तेच उगवते. “जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर” हा सृष्टीचा अढळ नियम आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व व्याख्याते डॉ. रफिक सय्यद यांनी केले. पारनेर येथील ‘किसान इंटरनॅशनल स्कूल’ मध्ये आयोजित किसान महोत्सव या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किसान शैक्षणिक संस्था अध्यक्ष चंद्रकांत चेडे, ह. भ. प सोपानकाका औटी, सावित्री फातिमा सदभावना मंचचे बाबुराव औटी ( सर), महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे( डिजिटल मिडिया)जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

     डॉ. सय्यद यांनी मानवी जीवनातील नीतिमत्तेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आजचा माणूस भौतिक सुखाच्या मागे धावताना आपल्या मुळांना विसरत चालला आहे. “क्षणिक सुखासाठी माणूस नीतीभ्रष्ट होत आहे, ही चिंतेची बाब आहे. भ्रष्टाचार, स्वार्थ आणि अधर्माच्या मार्गावर चालून मिळवलेले सुख हे अल्पजीवी असते. मात्र, त्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात.”माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे नुकसान करू नये, कारण निसर्गाचा न्याय कोणालाही सोडत नाही. आपण जे कर्म करतो, त्याचे प्रतिबिंब आपल्या भविष्यावर पडत असते, हा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला.


डॉ. सय्यद यांनी समाजात आढळणाऱ्या दोन प्रवृत्तींमधील फरक स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, “एक घटक असा आहे जो केवळ स्वतःच्या सुखासाठी नीतीमत्ता सोडतो, तर दुसरा असा घटक आहे जो जगातील दुःख आणि अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करतो. संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, संत कबीर, थोर महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच त्यागाचा मार्ग स्वीकारला, म्हणूनच आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.”

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, आपण जे काही वाईट किंवा चांगले कृत्य करतो, त्याचा हिशोब ईश्वराच्या दरबारी होतोच. “देव करी जे जे काही, आत्मा भोगती नंतर” या ओळींचा संदर्भ देत त्यांनी कर्मसिद्धांताचे महत्त्व पटवून दिले. शरीर केवळ माध्यम आहे, परंतु कर्माची फळे आत्म्याला भोगावी लागतात, त्यामुळे अंतर्मन शुद्ध ठेवणे आवश्यक आहे.


विद्यार्थ्यांवर संस्कारांची शिदोरी…
शालेय जीवनातच मुलांवर अशा प्रकारचे संस्कार होणे आवश्यक असल्याचे मत अध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी व्यक्त केले. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून चालणार नाही, तर एक चांगला माणूस म्हणून घडण्यासाठी आध्यात्मिक विचारांची जोड आवश्यक आहे. डॉ. रफिक सय्यद यांच्या रसाळ आणि ओघवत्या शैलीतील प्रवचनाने उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मंत्रमुग्ध झाले होते.

या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते “माणसाने सदैव सत्कर्माची कास धरावी,” हा संदेश दिला गेला.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments