Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरदुष्काळग्रस्त शेतकरी व आर्थिक संकटातील महिलांची सक्तीची कर्जवसुली थांबवा! रविंद्र राजदेव यांची...

दुष्काळग्रस्त शेतकरी व आर्थिक संकटातील महिलांची सक्तीची कर्जवसुली थांबवा! रविंद्र राजदेव यांची तहसीलदारांकडे मागणी



अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

पारनेर | प्रतिनिधी,

पारनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांची बँका, पतसंस्था, बचत गट, मायक्रो फायनान्स कंपन्या व इतर वित्तीय संस्थांकडून सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रविंद्र राजाराम राजदेव यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पारनेर तालुक्यातील शेतकरी सध्या प्रतिकूल परिस्थितीमुळे गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, दैनंदिन गरजा भागविणे आणि कर्जाचे हप्ते भरणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बँका, पतसंस्था, बचत गट आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवरील मानसिक आणि आर्थिक ताण वाढत आहे.


तालुक्यात कर्जाच्या तणावातून आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडल्याची बाबही निवेदनात नमूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे जीवन संपल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा संकटाच्या काळातच त्यांना आधार देणे गरजेचे असल्याचे राजदेव यांनी म्हटले आहे.

या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित बँका, पतसंस्था, मायक्रो फायनान्स कंपन्या, महिला बचत गट व इतर वित्तीय संस्थांच्या सक्तीच्या कर्जवसुलीबाबत लागू कायदे व शासनाच्या निर्देशांनुसार योग्य ती कार्यवाही करावी. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जवसुलीतून दिलासा मिळण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे तातडीने पाठपुरावा करून आवश्यक आदेश काढावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही रविंद्र राजदेव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी नगरसेवक योगेश मते, निलेश लंके प्रतिष्ठानचे पोपटराव गुंड, नवनाथ गांजे, चंदू खेमनर, गणेश मोरे, तुषार गाडेकर, सरपंच बापू ठुबे, दिनेश गायखे, शिवराम खरात, भानुदास घुले, सावकार मुळे, बाळासाहेब घुले, पोपट खरात, सुभाष खरात, विष्णू घुले, कैलास घुले, नामदेव घुले, निखिल खरात, बाबाजी घुले आदी उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
महिला बचत गटांच्या कर्जवसुलीलाही तात्पुरती स्थगिती द्यावी….

महिला बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला असून कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत अनेक महिला बचत गटांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बँका व वित्तीय संस्थांकडून बचत गटांच्या कर्जवसुलीसाठी दबाव आणला जात असल्याने महिलांवर मानसिक आणि आर्थिक ताण निर्माण होत आहे. महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण होणे गरजेचे असताना त्यांच्यावर सक्तीच्या वसुलीचा बोजा टाकणे योग्य नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थितीचा विचार करून महिला बचत गटांच्या कर्जवसुलीलाही तात्पुरती स्थगिती द्यावी, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी आणि महिलांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी शासनाने विशेष सवलती व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रविंद्र राजदेव यांनी केली.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“एकीकडे शेतकरी निसर्गाच्या संकटाशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे बँका, पतसंस्था, बचत गट आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या कर्जवसुलीमुळे तो मानसिक तणावाखाली जगत आहे. शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही, शेतमालाला योग्य भाव नाही, अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणणे अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांना आणि बचत गटातील महिलांच्या कर्जवसुलीच्या तगाद्यापेक्षा जगण्यासाठी आधार देण्याची गरज आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून सक्तीची कर्जवसुली थांबवावी. अन्यथा शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू.”
— रविंद्र राजाराम राजदेव
टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments