Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरनिलेश लंके यांच्या संघर्षाला लिमिट नाही; जनतेच्या प्रेमातूनच त्यांना ऊर्जा मिळते; माजी...

निलेश लंके यांच्या संघर्षाला लिमिट नाही; जनतेच्या प्रेमातूनच त्यांना ऊर्जा मिळते; माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गौरवोद्गार


दुष्काळाच्या संकटात खासदार म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा लंके यांना सल्ला

 लंके यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला माजी मंत्री थोरात यांची हंगा येथे उपस्थिती

पारनेर/प्रतिनिधी : 
नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या संघर्षाला कोणते ही लिमिट नाही. संपूर्ण नगर दक्षिणमधील सहा विधानसभा मतदारसंघांत ते सातत्याने फिरतात. प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे शक्य नसतानाही ते जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र धडपडत असतात. एवढा संघर्ष करण्याची आणि तरीही न थकता काम करण्याची ऊर्जा त्यांना कुठून मिळते, असा प्रश्न पडतो. मात्र, ही ऊर्जा त्यांना जनतेच्या प्रेमातून मिळते, असे गौरवोद्गार माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

पारनेर तालुक्यातील हंगा येथे खासदार निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ व स्नेहमेळावा कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम काकडे, राष्ट्रवादीचे नेते दीपक अण्णा लंके, ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव, मारुती रेपाळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे, रामेश्वर निमसे, ऍड. राहुल झावरे, कारभारी पोटघन, दादा शिंदे, शिक्षक नेते संतोष खामकर, ज्येष्ठ शिक्षक नेते द. मा. ठुबे गुरुजी, दत्तात्रय वारे, अभयसिंह नांगरे, बापू चत्तर, ज्ञानदेव लंके गुरुजी आदी उपस्थित होते. तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी, आपला मावळा संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, निलेश लंके हे जनमानसातून आणि मातीमधून उभे राहिलेले कसदार व्यक्तिमत्त्व आहे. अशा व्यक्तिमत्त्वाची जडणघडण सहज होत नाही. अनेक कसोट्यांमधून, संघर्षातून आणि अडचणींना सामोरे जात ते पुढे आले आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या काळात त्यांना किती त्रास सहन करावा लागला, याच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. आमच्या भागात एखाद्या टक्क्यानेही एवढा संघर्ष पाहायला मिळत नाही. त्यांच्या निवडणुकीच्या संघर्षावर स्वतंत्र पुस्तक तयार होऊ शकते आणि त्यातून अनेक शिष्य तयार होतील, असे मिश्कीलपणे सांगत त्यांनी लंके यांच्या संघर्षाचे कौतुक केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकांसाठी काम करताना खूप मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतात. जनतेचे सर्वच प्रश्न एका वेळी सुटतात असे नाही. मात्र, लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. निलेश लंके यांच्याकडे जनतेशी जोडलेपण आणि काम करण्याची प्रचंड ऊर्जा आहे. त्यांनी हीच ऊर्जा कायम ठेवून सर्वसामान्यांसाठी काम करत राहावे.

दरम्यान, हंगा येथे बाळासाहेब थोरात यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांचा सत्कार व सन्मानही करण्यात आला. खासदार निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या या दिवाळी फराळ व स्नेहमेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
लंके यांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला….

खासदार निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक करताना बाळासाहेब थोरात यांनी त्यांना स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्लाही दिला. जनतेसाठी काम करण्याची त्यांची तळमळ कौतुकास्पद असली, तरी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांनी असेच सर्वसामान्य जनतेसाठी काम करत राहावे, असे थोरात म्हणाले. यावेळी त्यांनी खासदार लंके यांना दिवाळी व पाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
केवळ दिवाळीला घरी जाऊन बसून चालणार नाही….

महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या गंभीर संकटातून जात असून नगर दक्षिणमधील परिस्थितीही चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत खासदार म्हणून निलेश लंके यांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. सरकारनेही आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. शेतकऱ्यांना दिली जाणारी पाच हजार रुपयांची मदत पुरेशी ठरणार नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. केवळ दिवाळीला घरी जाऊन बसून चालणार नाही, तर संकटाच्या काळात प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतील, अशा शब्दांत थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली.

🔶🔶🔶🔶🔶🔶
कोरोना सारखेच दुष्काळाचे संकट…

कोरोना महामारीच्या काळात जसे मोठे संकट निर्माण झाले होते, त्याच स्वरूपाचे दुसरे संकट आज दुष्काळाच्या रूपाने समोर उभे राहिले आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. हे संकट याच वर्षात संपले तर आनंदाची बाब असेल; मात्र त्यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments