महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या वतीने पारनेर पोलीस निरीक्षकांना निवेदन
पारनेर/प्रतिनिधी,
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पत्रकारांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया अहिल्यानगर व पारनेरच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या सोबतच पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या निलंबनाची आणि अवैध धंद्यांचा आका भोला उर्फ शेखर पाटील याला हद्दपार करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. मात्र, निडर पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न होत आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, राकेश सुतार आणि कुंदन बेलदार यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झाला आहे. यामागील कारण म्हणजे या पत्रकारांनी पाचोरा तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात बातम्या प्रसिद्ध केल्या, ज्यामुळे अवैध धंदे बंद झाले आणि पाचोरा पोलिसांचे कथित हप्ते थांबले. याचा राग आल्याने भोला उर्फ शेखर पाटील आणि पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी संगनमत करून पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप निवेदनात आहे.
पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, जिल्हाध्यक्ष दत्ताजी पाचपुते व दत्ताजी गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया अहिल्यानगर व पारनेर तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन सादर करताना अहिल्यानगर डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी वाघमारे, पारनेर शहराध्यक्ष भगवान गायकवाड, उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, निघोज शहराध्यक्ष आनंद भूकन आणि पत्रकार संघाचे सदस्य जय हरेल उपस्थित होते.
पत्रकार संघाने मागणी केली आहे की, अशोक पवार यांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांच्या अवैध मार्गाने कमावलेल्या संपत्तीची चौकशी करावी. तसेच, अनेक गुन्हे दाखल असलेल्या भोला उर्फ शेखर पाटील याला तालुक्यातून हद्दपार करावे. या मागण्या पूर्ण न झाल्यास पत्रकार संघ लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.




