Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेर तालुक्यात पाणी-चाऱ्याचा गंभीर प्रश्न; सुनिताताई सोबले यांचे प्रशासनाला निवेदन

पारनेर तालुक्यात पाणी-चाऱ्याचा गंभीर प्रश्न; सुनिताताई सोबले यांचे प्रशासनाला निवेदन


पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनाही दिले निवेदन

निवेदनातून वेधले पारनेर शहर व परिसरातील भीषण परिस्थितीकडे लक्ष


पारनेर/प्रतिनिधी : 
पारनेर शहर व तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, सर्वसामान्य नागरिक व पशुधन पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी होरपळून निघत आहे. या पार्श्वभूमीवर, तालुक्यात तात्काळ शासकीय टँकर सुरू करावेत, अवैध पाणी उपसा थांबवावा आणि पठार भागावर जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्त्या सुनिताताई सोबले यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पारनेरचे आमदार काशिनाथ दाते आणि तहसीलदार गायत्री सौंदणे यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सुनिताताई सोबले यांनी तालुक्यातील सोबलेवाडी, कुंभारवाडी, विरोली, करंडी या गावांसह पारनेर शहर व परिसरातील भीषण सद्यस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. चालू उन्हाळ्यात या संपूर्ण भागात पाण्याचे स्रोत पूर्णपणे आटले असून, पाण्यासाठी नागरिकांना मोठी भटकंती करावी लागत आहे. ज्या गावांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत, तिथे कोणतीही दिरंगाई न करता तातडीने शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, तालुक्यातील ज्या तलावांमध्ये सध्या थोडेफार पाणी शिल्लक आहे, त्याचे योग्य नियोजन करून ते पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात यावे, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

याशिवाय, तालुक्यातील मुख्य पाण्याच्या स्रोतांच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध पाणी उपसा सुरू असून, यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिकच तीव्र होत आहे. प्रशासनाने हा अवैध उपसा तात्काळ रोखून ते पाणी पिण्यासाठी सुरक्षित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पाण्यासोबतच तालुक्यात चाऱ्याचा प्रश्नही अत्यंत उग्र बनला असून जनावरांना जगवणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे गरज असलेल्या गावांमध्ये तातडीने चारा उपलब्ध करून द्यावा आणि पारनेर तालुक्याच्या पठार भागावर शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी तात्काळ ‘चारा छावण्या’ सुरू कराव्यात, या प्रमुख मागण्या सोबले यांनी लावून धरल्या आहेत.

पारनेर तालुक्यातील जनतेला आणि पशुधनाला या भीषण टंचाईतून दिलासा देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर योग्य नियोजन करावे, हीच आमची मुख्य मागणी आहे, असे सांगत सुनिताताई सोबले यांनी इशारा दिला की, जर यावर तात्काळ ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, तर नागरिकांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल. आता यावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महसूल प्रशासन किती वेगाने पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
पारनेर तालुक्यात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. सर्वसामान्य नागरिक आणि पशुधन या भीषण टंचाईत होरपळून निघत असताना प्रशासन मूग गिळून गप्प बसू शकत नाही. जर तात्काळ शासकीय टँकर आणि चारा छावण्या सुरू करून जनतेला दिलासा दिला नाही, तर नागरिकांच्या हक्कासाठी आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल.

— सुनिताताई सोबले (सामाजिक कार्यकर्त्या, पारनेर)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments