पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर शहर व तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पत्रकारिता क्षेत्रासह विविध विभागांमध्ये उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यासाठी ‘स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आले आहेत. शुक्रवार, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा सेनापती बापट स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे.
पारनेर परिसरातील व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्याने समाजाला दिलेले महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करणे, हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश आहे.
पुरस्कारांची घोषणा गौरव उद्योग समूहाचे अर्जुन भालेकर आणि कृषी व जनकल्याण प्रतिष्ठानचे अरुण आंधळे पाटील यांनी केली आहे.या भव्य समारंभासाठी खासदार डॉ. निलेश लंके आणि ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या शुभहस्ते निवडलेल्या पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात येणार आहे. पारनेर तालुक्यात विविध स्तरांवर महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या खालील मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे .(आरोग्य व अध्यात्मिक) डॉ. आर. जी. सय्यद, ( शिक्षण, संस्कृती व पर्यावरण) प्रा. डॉ. रंगनाथ आहेर सर, ( पत्रकारिता, लेखन व सामाजिक चळवळ) पत्रकार संजय वाघमारे, (शिवचरित्रकार लेखक) प्रसाद तारे, (आदर्श ग्रामपंचायत म्हसोबा झाप) प्रकाश गाजरे, ( पत्रकारिता ) पत्रकार मार्तंडराव बुचूडे सर, ( महिला सक्षमीकरण ) अलका कदम, ( समाजसेवक)गणपत वाफारे, साहित्यिक पत्रकारिता (विशेष) पत्रकार देविदास आबुज या सर्व पुरस्कार्थींनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या बहुमोल कामगिरीमुळे त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यासोबतच पारनेर नगरपंचायतच्या नूतन नगराध्यक्ष डॉ. विद्या कावरे आणि उपनगराध्यक्ष सुप्रिया सुभाष शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नगरपंचायत निवडणुकीनंतर पदभार स्वीकारलेल्या या नवीन नेतृत्वाचा गौरव यानिमित्ताने केला जाणार आहे.या कार्यक्रमासाठी आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि पारनेर शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजक विशेष प्रयत्न करत आहेत.परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी आणि हितचिंतकांनी या गौरवशाली कार्यक्रमास उपस्थित राहून पुरस्कार्थींना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक गौरव उद्योग समूहाचे अर्जुन भालेकर आणि कृषी व जनकल्याण प्रतिष्ठानचे अरुण आंधळे पाटील यांनी केले आहे.




