Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरपुरवणी मागण्यांवर आमदार काशिनाथ दाते यांचा घणाघात

पुरवणी मागण्यांवर आमदार काशिनाथ दाते यांचा घणाघात



दुर्गम शाळा, जलजीवन योजना, क्रीडा संकुल आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी सभागृहात आवाज

पारनेर / ता. प्रतिनिधी 

शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ सन २०२५–२६ च्या पुरवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेत पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी शिक्षण, क्रीडा, पाणीपुरवठा आणि दिव्यांग कल्याण या महत्त्वाच्या विषयांवर ठोस आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत सरकारचे लक्ष वेधले.

दुर्गम भागातील शाळांची दुरवस्था; २० ऐवजी १५ पटसंख्या मर्यादा करा
जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांची वास्तविक परिस्थिती मांडताना आमदार दाते म्हणाले की, पारनेर मतदारसंघातील अनेक वस्ती शाळांमध्ये आजही मूलभूत भौतिक सुविधा नाहीत. स्वच्छतागृह आहेत; परंतु पाण्याअभावी ती कायम अस्वच्छ राहतात. क्रीडांगणे अपुरी आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांबाबत संच मान्यता रद्द करण्याचा विचार होऊ नये, अशी ठाम भूमिका घेत त्यांनी ही मर्यादा २० ऐवजी १५ करावी, अन्यथा दुर्गम भागातील गरीब व शेतकरी कुटुंबांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील, असा इशारा दिला.

एआयच्या युगात ग्रामीण शाळांनाही इंटरॶॅक्टिव्ह बोर्ड द्या खाजगी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी एआयच्या युगात किमान इंटरॶॅक्टिव्ह बोर्डसारख्या सुविधा सर्व शाळांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. सध्या ५० टक्क्यांहून अधिक शाळा या सुविधांपासून वंचित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, पोषण आहारासाठी भरीव तरतूद झाली असली तरी प्रत्यक्षात मिळणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार करत त्याची नियमित तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी, अशी मागणी आमदार दाते यांनी केली. “मुलं अर्धा भात फेकून देतात; हा अपव्यय थांबवण्यासाठी गुणवत्तेची हमी आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

२० वर्षांपूर्वीचे क्रीडा संकुल जीर्ण; ३.५ कोटींच्या दुरुस्ती प्रस्तावाला मंजुरी द्या
पारनेर येथील २० वर्षांपूर्वी उभारलेल्या क्रीडा संकुलाची दुरवस्था मांडताना त्यांनी सांगितले की, जॉगिंग ट्रॅक, बॅडमिंटन हॉल यांसारख्या सुविधा जीर्ण झाल्या आहेत. साडेतीन कोटी रुपयांचा दुरुस्ती प्रस्ताव प्रलंबित असून राज्य क्रीडा समितीची बैठक लवकर घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजनांवर कठोर भूमिका
जलजीवन मिशनअंतर्गत पारनेर मतदारसंघात ८३ योजना मंजूर झाल्या; त्यापैकी केवळ २९ पूर्ण झाल्या असून उर्वरित ५४ योजना अपूर्ण अवस्थेत आहेत, असे सांगत आमदार दाते यांनी योजनेचा सखोल आढावा घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली.
सुपा औद्योगिक वसाहतीसाठी २० कोटींची योजना मंजूर होऊनही वीज जोडणीअभावी पाणीपुरवठा सुरू झालेला नाही, ही बाब गंभीर असल्याचे नमूद करत त्यांनी उर्वरित ३ ते ३.५ कोटींचा निधी जलजीवन योजनेतून तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली. आ. काशिनाथ दाते यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नांना राज्याच्या पातळीवर ठळकपणे मांडले. त्यांच्या या ठाम आणि अभ्यासपूर्ण मांडणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

🔶🔶🔶🔶🔶
दिव्यांगांसाठी अधिक सन्मानजनक सहाय्याची गरज आहे, दिव्यांगांना देण्यात येणारी मासिक मदत २५०० रुपये असली तरी ती अपुरी असल्याने वाढीव मदत देणे गरजेचे, त्यांना विजबिलात ५० टक्के सवलत देण्याची आवश्यकता तसेच जिल्हा नियोजन समितीच्या ३ टक्के निधीतून दिव्यांगांना वैयक्तिक साधनसामग्री (सायकल, ऑटो रिक्षा इ.) देण्याबाबत शासन निर्णयात स्पष्टता नसल्याने लाभ मिळत नाही; यासाठी तातडीने सुधारणा करावी, पुरवणी मागण्यांवरील चर्चेत ग्रामीण शिक्षणापासून पाणीपुरवठा, क्रीडा सुविधा आणि दिव्यांग कल्याणापर्यंत सर्वच मुद्द्यांवर सखोल व लोकाभिमुख भूमिका सरकारने घेतली पाहिजे.

 – आमदार काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments