Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरबिबट्याच्या हल्ल्यातील पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत; आमदार काशिनाथ दाते यांचे नागरिकांना...

बिबट्याच्या हल्ल्यातील पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत; आमदार काशिनाथ दाते यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन


पारनेर / भगवान गायकवाड, 

पारनेर तालुक्यातील किन्ही येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कै. भागूबाई विश्वनाथ खोडदे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत आज पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. या मदतीमध्ये १० लाख रुपयांचा धनादेश व १५ लाख रुपये एफडी स्वरूपात विश्वनाथ लक्ष्मण खोडदे यांचे नावे देण्यात आले.

यावेळी आमदार दाते यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतात व मोकळ्या परिसरात काम करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर जाणे टाळावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार दाते यांनी पुढे सांगितले की, बिबट्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभाग व शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील. नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत चेडे, पारनेर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. गजानन धाडे, भाळवणी वनपाल श्री. के. एस. साबळे, कान्हूर पठार वनरक्षक श्री. एन. व्ही. बडे, भाळवणी वनरक्षक श्री. बी. एस. दवणे, चालक दिगंबर विरोळे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

या मदतीमुळे पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली असून आमदार दाते यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
बिबट्यांच्या वाढत्या संचाराच्या पार्श्वभूमीवर वनविभाग नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत असून, संवेदनशील भागांमध्ये सतत गस्त, पिंजरे बसवणे व तातडीची कारवाई सुरू आहे. अशा दुर्दैवी घटनांनंतर पीडित कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी यासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून वनविभागाशी समन्वय साधावा. 

गजानन धाडे (प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी, पारनेर)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments