पारनेर/प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील दिपक सुदाम उंडे हा अडीच वर्षापासून बेपत्ता आहे. अद्याप त्या तरुणाचा तपास लागलेला नाही. त्यामुळे आता पारनेर पोलिसांनंतर स्थानिक गन्हें शाखेकडून हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून सीआयडीचे अधिकारी पारनेरमध्ये तळ ठोकून आहेत.
अडीच वर्षे उलटूनही दिपक उंडेचा तपास लागला नसल्याने कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने हा तपास सीआयडीकडे वर्ग करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दिपक उंडेचे अपहरण झाले की, घातपात किंवा अन्य काही याचा नव्याने तपास करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत.
वडील सुदाम उंडे यांनी अॅड. एन. बी. नरवडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. तपासी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार गुन्ह्यात योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.



