अहिल्यानगर / भगवान गायकवाड
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्नेहालय संचलित बालभवनच्या ‘उमेद प्रकल्पा’तर्फे घरेलू कामगार महिलांच्या सन्मानार्थ “घरेलू कामगार कार्ड वाटप समारंभ” स्नेहालय मानद संचालिका वैशाली चोपडा व अनिवासी प्रकल्प संचालक हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. रहेमत सुलतान फाउंडेशन, अहिल्यानगर येथे झालेल्या या कार्यक्रमात सेवावस्तीतील ११४ एकल, विधवा, घटस्फोटित व गरजू महिलांना महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या योजनेअंतर्गत ओळखपत्रे तसेच साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला तोफखाना पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. कल्पना चव्हाण, स्नेहालय उडान प्रकल्पाच्या मानद संचालिका अॅड. बागेश्री जरंडीकर, सरकारी कामगार अधिकारी अंबादास केदार, दुकाने निरीक्षक पी. एम. भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण यांनी डिजिटल युगात महिलांनी मोबाईल व सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करावा तसेच लहान मुलांना त्याचा अति वापर करू देऊ नये, असे आवाहन केले. अॅड. बागेश्री जरंडीकर यांनी महिलांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत समाजातील सकारात्मक बदलासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. अंबादास केदार यांनी महिलांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केले.
प्रास्ताविकात यास्मिन शेख यांनी ‘उमेद प्रकल्पा’अंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मागील सहा महिन्यांत शिवणकला व ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या चार बॅचेसमधून ८० महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून ३० महिलांना बँक पासबुक, ५० महिलांचे उद्यम आधार नोंदणी करण्यात आली आहे. तसेच २ महिला बचत गट स्थापन करण्यात आले असून २०–२५ महिलांना हँड एम्ब्रॉयडरी आणि ५० महिलांना साबण निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रवीण कदम यांनी बालविवाह या अनिष्ट प्रथेवर मार्गदर्शन करत समाजातील सर्व घटकांनी त्याविरोधात जागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांकडून बालविवाहविरोधी शपथही घेण्यात आली.
अहिल्यानगर शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पांतर्गत कष्टकरी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘उमेद प्रकल्प’ कार्यरत असून जिल्हा कामगार कार्यालयाच्या सहकार्याने घरेलू कामगार योजनेअंतर्गत २९२ महिलांचे अर्ज भरून देण्यात आले आहेत. त्यापैकी दुसऱ्या टप्प्यात 35 महिलांची ओळखपत्रे तयार झाली असून त्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यास्मिन शेख यांनी केले. सूत्रसंचालन प्रतीक्षा साळवे यांनी केले तर आभार उषा खोल्लम यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजू पांढरे, रुबिना शेख आणि बालभवन टीमने विशेष परिश्रम घेतले.
महिला दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम कष्टकरी महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि सामाजिक सुरक्षेचा संदेश देणारा ठरला.



