पारनेर | ता. प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गुणवत्तेने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. तळेगाव ढमढेरे, ता. मावळ येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी यशवर्धन दत्तात्रय थोरात याने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल ३०० पैकी २९६ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावून पारनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा लौकिक उंचावला आहे.
यशवर्धनच्या या उल्लेखनीय यशामागे पारनेर तालुक्यातील पळसपूर गावच्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. जयश्री इघे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि जिद्दीची कोणतीही कमतरता नाही, हे यशवर्धनने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे प्रोत्साहन आणि विद्यार्थ्याची मेहनत यांचा सुरेख संगम झाला की ग्रामीण भागातील विद्यार्थीही राज्याच्या पातळीवर सर्वोच्च स्थान मिळवू शकतो, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे.
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी यशवर्धन थोरात आणि मार्गदर्शक शिक्षिका सौ. जयश्री इघे मॅडम यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पारनेरच्या मातीतील या गुरूशिष्याचा संपूर्ण पुणे जिल्ह्यासह राज्याच्या शैक्षणिक नकाशावर उमटलेला हा गुणवत्तेचा ठसा निश्चितच कौतुकास्पद असून, “ग्रामीण पारनेरची गुणवत्ता पुणे जिल्ह्यातील मावळ तालुकाच काय तर संपूर्ण राज्यातही अव्वल ठरू शकते” हा आत्मविश्वास या यशामुळे अधिक दृढ झाला आहे. यशवर्धनच्या या उज्ज्वल कामगिरीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“यशवर्धनने मिळवलेले राज्यातील प्रथम क्रमांकाचे यश हे केवळ त्याच्या कुटुंबाचा किंवा शाळेचा अभिमान नाही, तर संपूर्ण पारनेर तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत, यशवर्धनची कामगिरी त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. यशवर्धन आणि जयश्री मॅडम यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन.”
आ. काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)



