पारनेर / भगवान गायकवाड,
“व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार; नशेला दूर ठेवा, उज्ज्वल भविष्य घडवा,” या प्रभावी संदेशातून ‘दहा कोटी नशामुक्त महाअभियाना’अंतर्गत डी बी एम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, राळेगण सिद्धी येथे व्यसनमुक्तीविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते बारावीतील सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमास प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, पारनेर सेंटरच्या संचालिका साधना दीदी, संगीता दीदी, स्नेहालय संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार भगवान गायकवाड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी ब्रह्माकुमारी साधना दीदी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व समजावून सांगितले. “नशा सोडा, जीवन जोडा; व्यसन टाळा, भविष्य घडवा,” या संदेशातून त्यांनी व्यसनामुळे शरीर, मन, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या विपरीत परिणामांची माहिती दिली. केवळ अमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणे पुरेसे नसून सकारात्मक विचार, चांगली जीवनशैली आणि आत्मसंयमही आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जी. डी. मापारी (सर) यांनी व्यसनाधीनतेच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना डिजिटल डिटॉक्सचा संदेश दिला. मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा अतिरेक हा देखील तरुण पिढीसाठी व्यसनाचे स्वरूप घेऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. “स्क्रीन कमी, स्वप्न मोठे; मोबाईलवर नियंत्रण, भविष्याचे संवर्धन,” असा संदेश देत तंत्रज्ञानाचा विवेकी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करून त्यांना आरोग्यदायी, सकारात्मक व संस्कारक्षम जीवनाकडे प्रेरित करणारा हा उपक्रम ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांनी नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. “नशामुक्त जीवनाचा स्वीकार, निरोगी समाजाचा निर्धार,” असा सामूहिक संकल्प करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



