पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील सुपा, रांजणगाव, अस्तगाव, पिंपरी गवळी, आपधुप, भोयरे गांगर्डा, कडूस, बाबुर्डी, वाळवणे आणि रूईछत्रपती या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली व हल्ल्यांत वाढ झाल्याने शेतकरी रात्री पंप चालवण्यासाठी शेतात जाण्यास असुरक्षित वाटत होते.
या पार्श्वभूमीवर संबंधित ग्रामपंचायतींनी दिवसा कृषी वीजपुरवठ्यास हरकत नसल्याची एनओसी सुपा शाखेकडे सादर केली. तसेच राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंचांचे शिष्टमंडळ यांनीही या मागणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत सुपा कार्यालयात अधिकृत निवेदन दिले होते.
सर्व एनओसी व सरपंच यांच्या निवेदनांचा आढावा घेतल्यानंतर सुपा शाखा अभियंता श्री. पिसाळ यांनी संपूर्ण बाब कार्यकारी अभियंता श्री. योगेश चव्हाण व उपकार्यकारी अभियंता श्री. शरद गहंदुळे यांच्यासोबत चर्चेस ठेवली. त्यानंतर संबंधित कृषी फीडरची सविस्तर विद्युत पुरवठा तपासणी करण्यात आली. तपासणी अनुकूल आढळल्याने कार्यकारी अभियंत्यांनी दिवसा कृषी वीजपुरवठ्यास मंजुरी दिली असून हा पुरवठा आज बुधवार दि. २६ पासून सुरू होणार आहे.
या निर्णयामुळे सुपा विभागातील शेतकऱ्यांना दिवसा ६ तास सुरक्षित वीजपुरवठा उपलब्ध होणार असून बिबट्याच्या भीतीमुळे निर्माण झालेला धोका आणि त्रास मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान पुर्वी महावितरण कडून एक आठवडा दिवसा तीन दिवस आणि रात्री चार दिवस तर पुढील आठवड्यात दिवसा चार दिवस तर रात्री तीन दिवस असा विद्युत पुरवठा केला जात होता. अपुऱ्या विद्युत पुरवठा मुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पाणी देण्यासाठी जीवावर उदार होऊन बाहेर पडावे लागत होते. गेल्या आठवड्यात रूईछत्रपती येथील शेतकऱ्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. यात ते दैव बलवत्तर म्हणून वाचले. माणसांवर व जनावरांवर या परिसरात बिबट्याने हल्ले केले आहेत. बिबट्याच्या भितीमुळे शेतकरी रात्री पिकाला पाणी देण्यासाठी बाहेर पडत नव्हते, परिणामी शेतात उभे पीक जळू लागले. मंगळवार दि.२५ रोजी राहुल पाटील शिंदे व सरपंच यांच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयात जाऊन निवेदन देत दिवसा शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा करावा अशी मागणी केली. यास कनिष्ठ अभियंता श्री पिसाळ यांनी प्रतिसाद देत बुधवार पासून दिवसा विद्युत पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी राहुल पाटील शिंदे यांचे आभार मानले आहेत.
यावेळी राहुल पाटील शिंदे, दत्ता नाना पवार, योगेश रोकडे, प्रतापसिंह शिंदे, विलास काळे, किसन मांडगे, प्रमोद दिवटे, कल्याण काळे, दादाभाऊ काळे, दत्तात्रय रोकडे, दत्तात्रेय रासकर, पुष्कराज किसन गवळी, अक्षय गवळी, ऋषिकेश ढवळे, महेश दळवी, संकेत मोकाते, अभिषेक दळवी, ब्रिजेश बोरुडे, योगेश दिवटे, पोपट पवार, नारायण पवार यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




