पारनेर / भगवान गायकवाड,
मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. उष्णतेने उच्चांक गाठल्यामुळे मानवासोबतच पशू-पक्षी आणि मुक्या जनावरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे तालुक्यातील पाणीसाठे आटले असून चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत, वाढदिवसाचा झगमगाट आणि अनावश्यक खर्च टाळून पारनेरचे उद्योजक राजुशेठ बेलोटे यांनी एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.वाढदिवसानिमित्त होणारे पुष्पहार, बॅनर आणि पार्ट्यांचा खर्च टाळून बेलोटे यांनी शहांजापूर येथील माऊली गोशाळेला संपूर्ण गाडीभर हिरवा चारा उपलब्ध करून दिला. तीव्र उन्हामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता भासत असताना, या मदतीमुळे गोशाळेतील शेकडो मुक्या जनावरांना मोठा आधार मिळाला आहे. केवळ उत्सव साजरा न करता प्रत्यक्ष कृतीतून सेवा करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.केवळ पाळीव प्राण्यांचाच विचार न करता, राजुशेठ बेलोटे यांनी वन्यजीवांच्या तहानेचाही विचार केला. पारनेर शहर परिसरातील सिद्धेश्वर रोड येथील वनविभागाच्या क्षेत्रात अनेक वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करत आहेत. ही गरज ओळखून त्यांनी वन्यजीवांसाठी घोटभर पाणी’या उपक्रमांतर्गत वनविभागाच्या कोरड्या पडलेल्या पाणवठ्यात पाणी सोडले. यामुळे वनक्षेत्रातील प्राण्यांना या भीषण उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे.या सामाजिक उपक्रमाच्या वेळी उद्योजक राजुशेठ बेलोटे यांच्यासह पत्रकार विनोद गोळे, पत्रकार संतोष सोबले, उद्योजक नवनाथ गाडगे, स्नेहालयचे सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड, अमोल ठुबे यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बेलोटे यांच्या या निर्णयाचे स्वागत करत, अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते, अशी भावना व्यक्त केली. आजच्या काळात वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती बदलत चालल्या आहेत. मात्र, निसर्ग आणि मुक्या प्राण्यांप्रती आपली असलेली जबाबदारी विसरून चालणार नाही. राजुशेठ बेलोटे यांनी राबवलेला हा उपक्रम समाजातील इतर तरुणांसाठी आणि उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. “अनावश्यक खर्च टाळून निसर्गसेवा करा,” हाच संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.



