Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरशाहीर रामदास गुंड यांच्या जाण्याने समाजजागृतीचा बुलंद आवाज हरपला - रवींद्र राजदेव

शाहीर रामदास गुंड यांच्या जाण्याने समाजजागृतीचा बुलंद आवाज हरपला – रवींद्र राजदेव


ज्येष्ठ लोककलावंत शाहीर रामदास गुंड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

पारनेर : प्रतिनिधी,
महाराष्ट्राच्या लोकसांस्कृतिक परंपरेला दिशा देणारे आणि सत्यशोधकी जलशांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची अखंड ज्योत तेवत ठेवणारे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ पारनेर तालुका नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शाहिरी आणि लोककलेचे विश्व शोकमग्न झाले आहे. डफावरच्या थापेने जनमानसाला जागृत करणारा एक प्रभावी आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

पारनेर तालुक्यातील कातळवेढे या छोट्याशा गावातून उभा राहिलेला हा कलावंत पुढे महाराष्ट्रभर परिचित झाला. शाहीर गुंड यांनी आपले संपूर्ण आयुष्य गावोगावी फिरून लोकजागृतीसाठी अर्पण केले. महागाई, दरवाढ, आरक्षण, बैलगाडा बंदी, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, व्यसनमुक्ती, जागतिक युद्ध, तसेच कोरोना महामारीसारख्या समकालीन विषयांवर त्यांनी आपल्या कलेतून प्रभावी भाष्य केले. त्यांच्या कार्यक्रमांना केवळ मनोरंजन नव्हे, तर विचारप्रवर्तक संदेश देणारी सामाजिक चळवळ अशी ओळख मिळाली होती.

शाहीर गुंड हे त्यांच्या कलगीतुरा फडासाठी राज्यभर ओळखले जात. पारंपरिक शाहिरीचा गाभा जपत त्यांनी त्यात समकालीन प्रश्नांची जोड दिली. चार वेद, सहा शास्त्र आणि अठरा पुराणांचा भेद मांडणारा दुर्मिळ आणि अभ्यासपूर्ण त्यांनी आपल्या सादरीकरणातून जिवंत ठेवला. त्यांच्या सादरीकरणात अभ्यास, विनोद, उपरोध आणि तीक्ष्ण सामाजिक भाष्य यांचा सुरेख संगम दिसत असे. त्यामुळे त्यांच्या जलशांना ग्रामीण भागात विशेष प्रतिसाद मिळत असे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
ज्येष्ठ लोककलावंत शाहीर रामदास गुंड यांच्या निधनाने लोककलेचा दीपस्तंभ हरपला – रवींद्र राजदेव…

“सत्यशोधकी जलशांच्या माध्यमातून समाजाला आरसा दाखवणारे आणि आपल्या पहाडी आवाजाने लोकजागृतीची मशाल तेवत ठेवणारे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर रामदास गुंड यांचे निधन ही अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी घटना आहे. त्यांच्या जाण्याने केवळ पारनेर तालुक्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि शाहिरी परंपरेचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे,” अशा शब्दांत रवींद्र राजदेव यांनी आपला शोक व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, “शाहीर रामदास गुंड यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी अर्पण केले होते. डफावर पडणारी त्यांची थाप केवळ मनोरंजन करणारी नव्हती, तर ती अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध दिलेला एक प्रहार होता. कलगीतुऱ्याच्या फडांतून त्यांनी सामान्य माणसाचे प्रश्न मांडले आणि प्रबोधनाची एक वेगळी दिशा निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे शाहिरी क्षेत्रातील एक झंझावात शांत झाला असून, डफ खऱ्या अर्थाने पोरका झाला आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments