कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा नगर कल्याण महामार्गावर एल्गार
महामार्ग अडवल्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा
पारनेर/प्रतिनिधी :
शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. शेतात रात्रंदिवस घाम गाळून पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाहीये. मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या या छळाकडे डोळेझाक करू नये. कांद्याला तात्काळ योग्य हमीभाव मिळालाच पाहिजे आणि जाचक निर्यातबंदी पूर्णपणे उठवली पाहिजे. जर सरकारने शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे वेळीच गांभीर्याने लक्ष दिले नाही आणि ठोस निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात हे आंदोलन उग्र रूप धारण करेल. शेतकरी आता आपल्या हक्कासाठी मागे हटणार नाही असे आंदोलन स्थळी राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव यांनी आक्रमक मत व्यक्त केले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, १५ मे रोजी नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथे खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रस्ता रोको आंदोलन एक तासभर करण्यात आले. नांदूर पठारचे सरपंच रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उग्र आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनात पारनेर, नगर आणि परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारनेर पोलीस स्टेशनच्या वतीने टाकळी ढोकेश्वर चौकातील रस्ता रोको आंदोलन स्थळावर मोठा पोलीस फौज फाटा बोलवण्यात आला होता व सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली.
सध्या बाजारात कांद्याला मिळणारा बाजारभाव अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचा साधा उत्पादन खर्चही निघत नाहीये. यामुळे शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याला योग्य हमीभाव मिळावा, निर्यातबंदी पूर्णपणे हटवण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची तातडीने अंमलबजावणी व्हावी, शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करण्यात यावीत आणि पीकविम्याचा हक्काचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी महामार्ग अडवून धरला.
या आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. आंदोलन स्थळी राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते मोहन रोकडे, महिला नेत्या सोनिया राजदेव, निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर, सरपंच प्रकाश गाजरे, उपसरपंच रामभाऊ तराळ, ज्येष्ठ नेते शशिकांत आंधळे, शहराध्यक्ष संदीप मते, लखन ठाणगे जालिंद लंके, विक्रम काळे, विश्वास शेटे, सरपंच शिवाजी निमसे, पोपट गुंड, संदीप ठाणगे, सरपंच अभिजित झावरे, प्रकाश राजदेव, भाऊसाहेब चौधरी, भानुदास आग्रे, बाळासाहेब चिकणे, सुनील मुळे, संतोष चिकणे, साहेबराव चिकणे, शिवराम चिकणे, रामभाऊ थोरात, सरपंच बापू ठुबे, आयुब हवलदार, गंगाराम चिकणे, रामदास साळवे, बापू नरड, पोपट नरड, राजेंद्र शेरकर, विकास दगाबाज, जयवंत वाळुंज यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव आणि कार्यकर्ते या आंदोलनात हिरीरीने सहभागी झाले होते.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे पारनेर तालुक्यातील सक्रिय राजकीय व सामाजिक नेते, सरपंच रवींद्र राजदेव यांनी यापूर्वीही रस्ते, पाणी आणि शेतीशी संबंधित अनेक प्रश्न यशस्वीपणे मार्गी लावले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांशी चर्चेचे अनेक प्रयत्न झाले; परंतु मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलनावरून मागे न हटण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अखेर मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील कांदा प्रश्न पुन्हा एकदा तीव्रतेने ऐरणीवर आला आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असून त्यांनी कष्टाने पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे.. नफा तर सोडाच पण उत्पादन खर्च सुद्धा त्यांना सुटत नाही.. रविंद्र राजदेव आणि सोनियाताई राजदेव यांनी रस्ता रोको आंदोलन करून सरकार समोर शेतकऱ्यांची खरी बाजू मांडण्याचं आणि झोपलेल्या सरकारला जागं करण्याचं काम केले आहे. असे समाजहिताचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे.
– निलेश लंके, खासदार, अहिल्यानगर दक्षिण
🔶🔶🔶🔶🔶🔶
आंदोलनामध्ये दिसून आले माणुसकीचे दर्शन..
नगर कल्याण महामार्गावर कांद्याच्या प्रश्नावर रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या वेळी कल्याण कडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आंदोलनकर्त्यांनी तात्काळ जागा उपलब्ध करून दिली त्यामुळे आंदोलन स्थळी माणुसकीचे दर्शन दिसून आले.
🔶🔶🔶🔶🔶🔶
राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे फिरवली पाठ..
राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चांगली तयारी केली होती मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक शेतकरी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होतील असे वाटत असतानाच खासदार निलेश लंके गटाचेच जवळचे कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे आंदोलन स्थळावर चर्चा होत होती. टाकळी ढोकेश्वर मधील स्थानिकांनीच आंदोलनाकडे पाठ फिरवली. राष्ट्रवादीची कार्यकारणी बरखास्त केल्यामुळेच आंदोलनाकडे पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली का अशी ही चर्चा सुरू होती.



