Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरशैक्षणिक ज्ञानासह जीवन कौशल्यांची जोडच घडवते विद्यार्थ्यांचे करिअर : डॉ. मंगेश वाघमारे

शैक्षणिक ज्ञानासह जीवन कौशल्यांची जोडच घडवते विद्यार्थ्यांचे करिअर : डॉ. मंगेश वाघमारे


 पारनेर महाविद्यालयात जीवन कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न

पारनेर भगवान गायकवाड, 
     केवळ महाविद्यालयीन पुस्तकी शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुरेसे नाही, तर त्यासोबत जीवन कौशल्यांचा विकास करणे हे करिअर घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. जीवनातच कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये त्याविषयी आवड निर्माण होते आणि रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी प्राप्त करण्याची जिद्द त्यांच्यात विकसित होते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. मंगेश वाघमारे यांनी केले.

पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये ‘आयक्युएसी’ (IQAC) आणि बी.बी.ए. (सी.ए.) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जीवन कौशल्य विकास’ (Life Skills Development) कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. वाघमारे म्हणाले, सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि एक जबाबदार व सक्षम युवा पिढी घडविण्यासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षणाची गरज आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील संधींची जागरूकता वाढण्यास मदत होते.

           कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी आपल्या मनोगतातून ‘सॉफ्ट स्किल्स’चे (मृदू कौशल्ये) महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “सॉफ्ट स्किल्स म्हणजे केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे, तर ती आपल्या वर्तणुकीशी आणि परस्पर संवादाशी निगडीत असतात. आपण इतरांशी किती प्रभावीपणे संवाद साधतो आणि कठीण परिस्थिती कशा प्रकारे हाताळतो, यावर आपली प्रगती अवलंबून असते. जरी या कौशल्यांचा थेट व्यावसायिक फायदा दिसत नसला तरी, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेऊन समाधान मिळविण्यासाठी ती मोलाची ठरतात.”

         या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, आयक्युएसी समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, बी.बी.ए. (सी.ए.) विभाग समन्वयक डॉ. युवराज वाघेरे आणि बी.बी.ए. विभागप्रमुख प्रा. रणजित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        कार्यशाळेचे सूत्रसंचालन विभागातील विद्यार्थ्यांनी अतिशय नेटकेपणाने केले. या उपक्रमाचे यशस्वी नियोजन प्रा. प्रियांका आतकर, प्रा. पूजा शिंगोटे व प्रा. वैशाली नगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. राजेश पिंपरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments