पारनेर / ता. प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील श्री देवी अंबिका ट्रस्टला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा यासाठी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असून या प्रयत्नांना आता यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संबंधित प्रस्तावाची मंजुरी अंतिम टप्प्यात पोहोचली असून यासंदर्भात आज आमदार काशिनाथ दाते सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत तसेच देवीभोयरे गावच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमारजी गोरे यांची मुंबई येथे भेट घेतली.
यावेळी आमदार दाते सर यांनी देवीभोयरे येथील श्री देवी अंबिका देवस्थान हे संपूर्ण देशातील गोसावी समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान असल्याचे सांगितले. वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. मात्र सध्या ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा असल्याने निधीच्या मर्यादा येत असून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या देवस्थानास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
मतदारसंघातील धार्मिक, सामाजिक व विकासात्मक प्रश्नांबाबत सातत्याने संवेदनशील भूमिका घेत आमदार काशिनाथ दाते सर कार्यरत असल्याचे या पाठपुराव्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसोबतच धार्मिक स्थळांच्या विकासासाठीही शासन दरबारी प्रभावीपणे आवाज उठवत आवश्यक निधी व सुविधा मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. देवीभोयरेसारख्या श्रद्धास्थानाचा विकास झाल्यास भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध होतील, स्थानिक रोजगाराला चालना मिळेल तसेच परिसराच्या विकासालाही गती मिळेल, ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडली आहे.
सदर मागणीवर मंत्री मा. जयकुमारजी गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत आश्वासन दिले. त्यामुळे देवीभोयरे गावासह संपूर्ण भाविकवर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच श्री देवी अंबिका ट्रस्टला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.अंबिका माता ट्रस्ट अध्यक्ष शिवाजीराव जाधव, विश्वनाथ गाजरे गुरुजी, मा. उप सरपंच विकास सावंत, बाबुराव मुळे, व्हा. चेअरमन गोपीचंद बेलोटे, मा. उपसरपंच दत्तात्रय दौलत बेलोटे, सुभाष किसन बेलोटे, बाबुराव एकनाथ बेलोटे, अक्षय राजाराम बेलोटे, भाऊसाहेब पोपट सरडे, कमलाकर लहू बेलोटे, यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.



