पारनेर / ता. प्रतिनिधी,
पावसाळी अधिवेशन २०२६ दरम्यान सन २०२६-२७ च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सरांनी शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेशी निगडित अनेक महत्त्वाचे प्रश्न विधानसभेत ठामपणे मांडत शासनाचे लक्ष वेधले. केवळ समस्या मांडण्यापुरते न थांबता त्यावर ठोस उपाययोजना सुचवत जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याची मागणी केली.
आमदार दाते म्हणाले राज्य सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करतो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्री यांचे अभिनंदन. मात्र, यापूर्वी कर्जमाफी मिळालेल्यांना यावेळी केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो. राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.
कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. पूर्वी मंडळ स्तरावरील एकाच पर्जन्यमापकावर अवलंबून राहावे लागत असल्याने अनेक गावांवर अन्याय होत होता, अवर्षण व अतिवृष्टीग्रस्त भागांना या योजनेत प्राधान्य देण्याची रास्त मागणी आहे. ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या योजनांचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे.
पशुसंवर्धन विभागाच्या योजनांवर बोलताना दुधाळ गायी-म्हैस पालन, शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारख्या जोडधंद्यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, असे सांगत अशा योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे वर्ग झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी याची तातडीने दखल घेऊन रिक्त पदे भरावीत, अशी मागणी आ. दातेंनी केली.
सार्वजनिक आरोग्य विभागावरील चर्चेत आमदार दाते यांनी आपल्या मतदारसंघातील टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयचे दयनीय अवस्था सभागृहात मांडली. सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या इमारतीत मूलभूत सुविधांचा अभाव असून ग्रामीण नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या आरोग्य केंद्राचे तातडीने नूतनीकरण करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार काशिनाथ दाते यांनी मांडलेल्या मुद्द्यांमधून केवळ पारनेर मतदारसंघाचाच नव्हे, तर राज्यातील शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडल्याचे दिसून आले. विकास, न्याय्य लाभ आणि लोकहित यांना केंद्रस्थानी ठेवून शासनाकडून ठोस निर्णय व्हावेत, यासाठी त्यांनी सभागृहात घेतलेली भूमिका पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या नेतृत्वाची ओळख अधोरेखित करणारी ठरली असल्याचे दिसून आले.



