वसुबारस निमित्त देवकृपा फाउंडेशनच्या वतीने ६५० हून अधिक गोवंशासाठी चारा वाटप
पारनेर | प्रतिनिधी,
दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस या सणाचे औचित्य साधून शिवसेना नेते तथा जिल्हा परिषद अहिल्यानगरचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या संकल्पनेतून देवकृपा फाउंडेशनच्या वतीने पारनेर तालुक्यातील दोन गोशाळांमध्ये गोवंशासाठी चारा वाटप करण्यात आले. शहांजापूर येथील श्री माऊली कृपा गोधाम महातीर्थ, श्री क्षेत्र कोडेश्वर तसेच गटेवाडी येथील रामकृष्ण हरी गोशाळा येथे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते हा उपक्रम राबविण्यात आला.
शहांजापूर येथील गोशाळेत ६५० हून अधिक गोवंश असून त्यांच्या चाऱ्याची गरज लक्षात घेऊन देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून चारा उपलब्ध करून देण्यात आला. तसेच गटेवाडी येथील रामकृष्ण हरी गोशाळेतील जनावरांनाही चारा वाटप करण्यात आले. वसुबारस हा गोमातेच्या पूजनाचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असल्याने या दिवशी गोसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की, “भारतीय संस्कृतीमध्ये गाईला मातेचे स्थान आहे. वसुबारस हा केवळ गोपूजनाचा सण नसून मुक्या प्राण्यांप्रती आपली कृतज्ञता आणि संवेदनशीलता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गोशाळांमध्ये अनेक निराधार आणि मुक्या जनावरांची सेवा केली जाते. या जनावरांना चारा उपलब्ध करून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सण-उत्सव साजरे करताना समाजातील गरजू घटकांसोबतच मुक्या जीवांचीही काळजी घेतली पाहिजे. देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही अशा सेवाभावी उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल. गोसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.”
गटेवाडी येथील कार्यक्रमप्रसंगी रामकृष्ण हरी गोशाळेचे नवनाथ महाराज गट, सुपा गावचे सरपंच योगेश रोकडे, सरपंच अण्णा मोटे, घाणेगावचे चेअरमन अनिल वाबळे, बाबा गाडेकर, शंकर साळुंके, संतोष गाडे, किशोर वाबळे, वैभव काळे, धनंजय शेलार, प्रवीण मापारी आदी उपस्थित होते.
शहांजापूर येथील कार्यक्रमप्रसंगी सुपा गावचे सरपंच योगेश रोकडे, अण्णा मोटे, संजय मोटे, शंकर महांडुळे, वैभव काळे, नितीन महाराज शिंदे, प्रमोद महाराज गवळी, सचिन महाराज शिंदे, नामदेव म्हस्के, भोयरे पठारचे डॉ. अमोल टकले, भाऊ टकले, धनंजय शेलार, संतोष मापारी, दत्तू शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
वसुबारसच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या गोसेवा उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.



