पारनेर | प्रतिनिधी,
शासनाच्या सेवा संकल्प अभियानातून ग्रामीण भागातील शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा उपक्रम यशस्वी होत असून, पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देसवडेने या अभियानाच्या माध्यमातून अक्षरशः कात टाकली आहे. शाळेची रंगरंगोटी, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, विद्युत सुविधा, वाचनालयाची आकर्षक मांडणी आणि परिसराचे सुशोभीकरण अशा विविध कामांमुळे शाळेला नवे आणि प्रसन्न रूप प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतींनी शाळांच्या भौतिक सुविधांकडे विशेष लक्ष दिले. पारनेर तालुक्याच्या उत्तर टोकाला असलेल्या देसवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यंदा ग्रामस्थांच्या मागणीनुसार इयत्ता सहावीचा वर्ग नव्याने सुरू करण्यात आला आहे. मात्र, अनेक वर्षांपासून रंगरंगोटी न झाल्याने शाळेची इमारत आणि परिसराचे सौंदर्य हरवले होते. ही बाब शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी विजय आहेर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सेवा संकल्प अभियानातून शाळेचा कायापालट करण्याचा संकल्प केला.
त्यानुसार अवघ्या पंधरा दिवसांत शाळेची संपूर्ण रंगरंगोटी करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी आकर्षक सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला. नादुरुस्त स्वयंपाकगृहाची दुरुस्ती, कुसुमाग्रज वाचनालयाची आकर्षक मांडणी, नवीन टेबलची खरेदी, विस्कळीत विद्युत व्यवस्था सुरळीत करणे, स्वतंत्र इन्व्हर्टरची सुविधा आणि स्वच्छतागृहांची दुरुस्ती अशी विविध कामे पूर्ण करण्यात आली. तसेच ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. या सर्व कामांमुळे शाळेचे रूप पूर्णपणे बदलले असून विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध झाले आहे.
शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ, शिक्षक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या एकजुटीच्या प्रयत्नांतून हा कायापालट साकार झाला आहे. याच धर्तीवर महसूल गाव देसवडे अंतर्गत टेकडवाडी आणि काळेवाडी येथील शाळांचीही लवकरच रंगरंगोटी व सुशोभीकरण करून आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.
या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, गटशिक्षणाधिकारी तेजस्विनी पवार, शिक्षण विस्तार अधिकारी विनेश लाळगे आणि केंद्रप्रमुख डॉ. बाळासाहेब शिंगोटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
गावाचा शाळेला आधार आणि शाळेचा गावाला अभिमान! या भावनेतून ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेले प्रयत्न ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत. विद्यार्थ्यांना आनंददायी शैक्षणिक वातावरण मिळावे, त्यांच्यातील गुणवत्ता आणि कलागुणांना वाव मिळावा, तसेच गावाची शैक्षणिक प्रगती व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेला देसवडे शाळेचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी नमूद केले.



