पारनेर / भगवान गायकवाड,
सेवा संवर्धन कार्यशाळांमुळे छोट्या आणि मध्यम सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यपद्धती अधिक सक्षम करता येतील. अशा सामाजिक संस्था समाजविकासात शाश्वत योगदान देऊ शकतील असे प्रतिपादन देणे समाजाचे या पुणे उपक्रमाच्या संस्थापिका वीणा गोखले यांनी येथे केले.
स्नेहालय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय द्वितीय निवासी सेवा संवर्धन कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती गोखले यांच्या हस्ते झाले. त्यांचा
” देणे समाजाचे “, हा उपक्रम मागील दोन दशकांपासून देणगीदार आणि कार्यकर्त्यांशी सामाजिक संस्थांना जोडण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे.
श्रीमती गोखले यांनी नमूद केले की,
समाजकार्याच्या वाटचालीत स्नेहालयची साथ – सोबत महत्त्वाची ठरली. आतापर्यंत हजारो नवोदित आणि छोट्या संस्थांना देणगीदार आणि कार्यकर्ते जोडून त्यांच्या कार्याला योग्य दिशा आणि बळकटी देण्यात आली. पुण्याप्रमाणेच मुंबई, ठाणे इत्यादी शहरात याचे आयोजन केल्यावर लवकरच कोल्हापूर येथेही देणे समाजाचे, हा उपक्रम आयोजित केला जाणार असल्याचे श्रीमती गोखले म्हणाल्या.
‘जनसंपर्क व्यवस्थापन ’ या विषयावरील परिसंवादात परिसंवादात रीमा अमरापूरकर, वीणा गोखले आणि स्नेहालयाच्या सचिव डॉ. प्रीती भोंबे यांनी संवाद केला.यावेळी अमरापूरकर यांनी सोशल मीडियाच्या प्रभावी वापराची तंत्र – मंत्र सांगितली . वीणा गोखले यांनी विविध कंपन्यांकडून मिळणाऱ्या सामाजिक दायित्व देणग्यांसोबतच (सीएसआर) वैयक्तिक देणगीदारांचे महत्त्व अधोरेखित केले . संस्थेच्या छोट्या गरजा व उपक्रम वैयक्तिक देणगीदारांच्या माध्यमातून सहज पूर्ण करता येतात. या गटातून कार्यकर्ते मिळवता येतात. त्यासाठी देणगीदारांशी सातत्याने संवाद आणि नाते जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक स्नेहालयाचे विश्वस्त आणि कार्यशाळेचे आयोजक शशिकांत सातभाई यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल गावडे व प्रमुख पालक राजीव गुजर यांनी कार्यशाळेची भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला.
कार्यशाळेत महाराष्ट्रातील 50 सामाजिक संस्थांचे 86 संस्थापक व त्यांचे सहकारी सहभागी झाले आहेत. यापुढे अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन अधिक मोठ्या प्रमाणावर करावे, अशी मागणी सहभागी संस्थांकडून यावेळी करण्यात आली.





