पारनेर / भगवान गायकवाड,
अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्था संचलित उडान प्रकल्प सदस्यांनी नुकतीच राळेगण सिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान स्नेहालय संस्था संचलित उडान प्रकल्प आणि मुक्ती वाहिनी प्रकल्पाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेत अण्णासाहेब हजारे यांनी स्नेहालयच्या टीमला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी स्नेहालय संचलित ‘उडान’ प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार भगवान गायकवाड, महेश शिंदे , शशिकांत शिंदे आणि प्रतीक्षा वाघ यांचा समावेश होता.
भेटीदरम्यान प्रवीण कदम यांनी स्नेहालय संस्थेच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. स्नेहालय संस्था संचलित उडान प्रकल्प आणि मुक्ती वाहिनी प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील वंचितांसाठी, विशेषतः मुलांच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू बालविवाह ,बालहक्क आणि संरक्षण’ हा होता. उडान प्रकल्पाचे माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, बालमजुरी निर्मूलन, शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, बालकांवरील अत्याचारांना प्रतिबंध करणे आणि अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत असलेल्या बालकांना तात्काळ सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील बालकांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या या विविध प्रकल्पांची माहिती ऐकून अण्णासाहेबांनी समाधान व्यक्त केले.विशेष म्हणजे, उडान प्रकल्पाचे माध्यमातून अहिल्यानगर जिल्हा पूर्णपणे ‘बालविवाह मुक्त’ करण्याचा जो निर्धार केला आहे, त्याची माहिती यावेळी देण्यात आली. सन २०२७ पर्यंत संपूर्ण जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे मोहिमेला अधिक गती देऊन लवकरात लवकर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.या भेटीमुळे स्नेहालयच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला असून, अण्णासाहेबांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शनामुळे बालहक्क रक्षणाच्या कार्याला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास प्रवीण कदम यांनी व्यक्त केला. या भेटीने स्नेहालयच्या सामाजिक कार्याची दखल ज्येष्ठ समाजसेवकांकडून घेतली गेल्याने परिसरात कौतुक होत आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
बालकांचे रक्षण करणे हेच राष्ट्राच्या उभारणीचे खरे कार्य आहे. समाजात होणारी बालविवाह सारखी अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी केवळ कायद्याची मदत घेऊन चालत नाही. तर त्यासाठी लोक चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. स्नेहालय संस्थेच्या कार्याचा गौरव करून त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन सदस्यांना केले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे.



