Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeजुन्नरकष्ट, संस्कार आणि माणुसकीचा वारसा देणाऱ्या सौ. गंगूबाई सिताराम औटी यांना दशक्रिया...

कष्ट, संस्कार आणि माणुसकीचा वारसा देणाऱ्या सौ. गंगूबाई सिताराम औटी यांना दशक्रिया विधीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली


राजुरी (ता. जुन्नर) : भगवान गायकवाड,
जुन्या पिढीतील कष्ट, साधेपणा, संस्कार, भक्ती आणि माणुसकीचा आदर्श जपणाऱ्या सौ. गंगूबाई सिताराम औटी यांच्या दशक्रिया विधीनिमित्त राजुरी येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दशक्रिया विधी कार्यक्रमास जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पांडुरंग पवार, ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे (उर्फ चेतन आनंद महाराज), अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य धनंजय गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत गंगूबाई औटी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

सौ. गंगूबाई औटी यांचे जीवन म्हणजे कष्ट, त्याग, संस्कार आणि प्रेमाने उभा केलेल्या संसाराचा आदर्श होता. राजुरीसारख्या आवर्षणप्रवण भागात पाणीटंचाई, शेतीची आव्हाने आणि आर्थिक अडचणी असतानाही त्यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. काबाडकष्ट करून त्यांनी शेती, संसार आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

१० ते १२ एकर शेती असूनही त्यांनी आणि पती सितारामराव औटी यांनी कधीही श्रमाची लाज बाळगली नाही. स्वतः शेतात राबून त्यांनी मुलांना स्वावलंबन, प्रामाणिकपणा आणि कष्टाचे महत्त्व शिकवले.

धार्मिक आणि भक्तिमय जीवन जगणाऱ्या गंगूबाई औटी यांच्या स्वभावात नम्रता, संयम आणि प्रेम हे मोठे धन होते. त्यांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श जपला. मुलांबरोबरच नातवंडे, भाचे, पुतणे यांच्यावर त्यांनी मायेची सावली धरली. मोठे कुटुंब एकत्र ठेवण्याची ताकद त्यांच्या प्रेमळ स्वभावात होती.

त्यांचे निसर्गप्रेमही विशेष उल्लेखनीय होते. घराभोवती त्यांनी परसबाग फुलवली होती. रामफळ, चिकू, पेरू, पपई, आंबा, जांभूळ, शेवगा यांसारखी फळझाडे तसेच पारिजातक, जाई-जुई आणि औषधी वनस्पतींची त्यांनी जपणूक केली.

अशा या मातेच्या संस्कारातूनच बाळासाहेब सिताराम औटी यांच्यासारखे समाजासाठी झटणारे नेतृत्व घडले. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि समाजहितासाठी कार्य करणे हे संस्कार त्यांना आई-वडिलांकडून मिळाले.

बाळासाहेब औटी यांनी ग्राहक, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अनेक सामाजिक लढे उभारले. ग्राहक हक्कांसाठी न्यायालयीन लढे, जलजागृती दिंडी, “ऑपरेशन धूळफेक” आंदोलन, वीज ग्राहकांच्या प्रश्नांवरील संघर्ष, पुणे–नाशिक औद्योगिक महामार्गासाठी जनआंदोलन तसेच ग्राहकांच्या हक्कांसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन अशा विविध माध्यमातून त्यांनी जनतेचा आवाज बुलंद केला.

त्यांच्या सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. बाळासाहेब सिताराम औटी हे श्री खंडेराया भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, राजुरीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली श्री खंडोबा मंदिर जीर्णोद्धार, मंदिर परिसर विकास, भव्य सभागृह, दीपमाळ आणि प्रवेशद्वार उभारणी यांसारखी विविध विकासकामे करण्यात आली आहेत.

श्री खंडोबा मंदिराच्या विकास कार्यासाठी बाळासाहेब सिताराम औटी आणि औटी परिवाराने श्री खंडेराया भैरवनाथ देवस्थान ट्रस्टला १ लाख ६१ हजार रुपयांची देणगी देऊन धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.

जनता विकास मंडळ शिक्षण संस्था तसेच गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्येही औटी परिवाराचे योगदान राहिले आहे.

गंगूबाई औटी यांच्या संस्कारामुळेच औटी कुटुंबाने शेती क्षेत्रातही प्रगती केली असून डाळिंब बागा, ऊस शेती आणि कष्टातून उभे केलेले भरभराटीचे कुटुंब हे त्यांच्या जीवनमूल्यांचे प्रतीक आहे.

दशक्रिया विधीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी गंगूबाई औटी यांच्या साधेपणा, त्याग, प्रेम आणि संस्कारांचे स्मरण केले. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती व सद्गती लाभावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.

“कष्टातून संस्कार, संस्कारातून समाजसेवा आणि प्रेमातून माणुसकीचा वारसा देणाऱ्या या महान मातेच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील.”
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments