आमदार काशिनाथ दाते सरांचे नागरिकांना आवाहन
पारनेर / ता. प्रतिनिधी,
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी नागरिकांनी संबंधित योजनेचे नियम तपासून घ्यावेत. इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेत असलेल्या नागरिकांनी संजय गांधी निराधार योजनेच्या पात्रतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून खात्री करूनच अर्ज करावा, असे आवाहन पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पारनेर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे पदसिद्ध अध्यक्ष काशिनाथ दाते सर यांनी केले.
पारनेर तहसील कार्यालयात आज आमदार काशिनाथ दाते सर यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी तहसीलदार गायत्री सौंदाणे, नायब तहसीलदार आकाश किसवे यांच्यासह समितीचे सदस्य सुधामती कवाद, पंढरीनाथ उंडे, अशोक खैरे, रवींद्र आहेर, रमेश गाडगे, तुकाराम खाडे तसेच संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार दाते सर यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पीएम किसान सन्मान निधी योजना यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित योजनांचे नियम आणि पात्रतेच्या अटी तपासून घ्याव्यात. नियमानुसार अपात्र ठरणाऱ्या अर्जांमुळे अर्जदारांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाया जातो.
शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा आणि नागरिकांची अनावश्यक धावपळ टाळावी, या उद्देशाने आमदार दाते सर यांनी हे आवाहन केले. त्यामुळे नागरिकांनी कोणताही अर्ज करण्यापूर्वी संबंधित तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्यावे आणि पात्रतेची खात्री करूनच पुढील प्रक्रिया करावी, असेही त्यांनी सूचित केले.
पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि जमा होणाऱ्या उच्चांकी अपात्र अर्जांमुळे नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होऊ नये, यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे, हा या बैठकीतील आवाहनाचा मुख्य उद्देश होता.



