तालुकाध्यक्ष पद निष्ठावंतांना डावलून आया रामांना संधी दिल्यामुळे संभाजी रोहोकले सर यांची नाराजी
पारनेर / प्रतिनिधी,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पारनेर तालुका तालुकाध्यक्ष निवडीवरून पक्षाअंतर्गत मतभेदामुळे काँग्रेस पक्षाला घरघर लागणार आहे.
काँग्रेस पक्षाचे तालुकाअध्यक्ष संभाजीराव रोहोकले सर यांच्यासह तालुका कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवार दि. ११ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह पारनेर येथे पत्रकार परिषद घेऊन पारनेर तालुका काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांच्या निवडी विषयी नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे.
या पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष सुरेशराव मेसे, बाळासाहेब रोहोकले सर, युवक तालुकाध्यक्ष योगेश शिंदे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष गणीभाई इनामदार, सेवा दल अध्यक्ष संजय मेचे, ओबीस सेल अरविंद्र लोंढे, मागासवर्गीय सेल अजित साळवे, बेबीताई गोरडे, सरचिटणीस अभिजित कारखिले , यश राहाणे, भटक्या जाती जमाती अध्यक्ष रावसाहेब सांगळे, सोशल मिडिया अध्यक्ष सुनिल व्यवहारे, तेजस सकट, शैलजा कारखिले, गोरख रोहोकले, संजय रासकर, रामदास ठुबे, संतोष काकडे, अजित सांगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रोहोकले सर म्हणाले की, पारनेर तालुका काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांची निवड ही अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. जे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहे त्यांनी कधीही काँग्रेस पक्षाचे काम केले नाही. जे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्य सुद्धा नाही अशा लोकांना तालुकाध्यक्षपदी निवड करून निष्ठावंतांना डावलले गेले आहे.
तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचे १९८५ सालापासून मी काँग्रेस पक्षाचे काम करत आहे माजी खासदार बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत काम केलेले आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकी मध्ये विखे परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी त्यांच्या समावेशात न जाता मी काँग्रेस पक्षामध्येच राहण्याचा निर्धार घेतला.
यानंतर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावरती तालुका अध्यक्ष पदाची धुरा सोपवली होती. गेल्या आठ वर्षांपासून तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे.
नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांनी 26 ऑक्टोबर पारनेर येथे तालुकाध्यक्ष फेरबदल बैठक बोलावली होती या बैठकीला तालुका कार्यकारणीचे प्रमुख बोलवा असे त्यांनी सांगितले या बैठकीला मोजकेच पदाधिकारी उपस्थित राहिले. बैठक संपन्न झाल्यानंतर मी पारनेर तालुका दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला गेलो असता. यानंतर गेल्या दोन तासानंतर याच ठिकाणी ज्ञानदेव वाफारे यांनी पक्षा व्यतिरिक्त बाहेरील कार्यकर्त्यांना बोलावून ईश्वर दिवटे यांच्या नावाचा ठराव झाला असे वरिष्ठांना भासवले
या झालेल्या प्रकाराबद्दल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली यावेळी थोरात म्हणाले होते की तालुक्यामध्ये फेरबदल करताना तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय फेरबदल करणार नाही असे सांगितले होते मात्र त्यांनीही आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही.
ज्ञानदेव वाफारे यांच्या सांगण्यावरून दक्षिण जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांनी पारनेर काँग्रेसच्या तालुकाअध्यक्षपदी ईश्वर दिवटे यांची निवड केलेली आहे. झालेली तालुका अध्यक्ष पदाची निवड ही आम्हाला मान्य नाही यामुळे तालुका कार्यकारणीच्या प्रमुखांनी सामूहिक राजीनामे देण्याची भूमिका घेतलेली आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
साहेब म्हणायच्या लायकीचे ज्ञानदेव वाफारे नाहीत…!
पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यात मोठा गुन्हा केलेले ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, परंतु एक कोटी रुपयाचा जामीन त्यांनी भरलेला आहे.त्यांनी हे एक कोटी रुपये कोठून आणले आहे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय..? या माणसाचे राजकारणातले स्थानिक नेतृत्व ऐकत असून ते ऐकू नये अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा असून साहेब म्हणायच्या लायकीचे ज्ञानदेव वाफारे नाहीत अशी बोचरी टीका तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले सर यांनी केली आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
२६२ पैकी २४२ बुथवर बी यल ए – २ च्या नेमणुका अतिशय परिश्रम घेऊन तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले यांनी पूर्ण केलेल्या आहेत त्या सर्वांनी फोन करून, निरोप देऊन, बुथवर काम न करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
– योगेश शिंदे, तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस.



