रविवारी कोरठण खंडोबाला महारती करत घालणार साकडे
पारनेर/प्रतिनिधी :
आगामी काळात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पारनेर तालुक्यातील बलुतेदार समाजाचे नेते आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस बाळासाहेब शिरतार यांनी ही मागणी लावून धरली आहे.
बाळासाहेब शिरतार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमचे नेते दौलतनाना शितोळे यांनी जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट केले आहेत. तळागाळातील सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे, शितोळे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू आणि ‘गुड बुक’मधील नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी द्यावी, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि खंडोबा देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटना व समस्त बहुजन समाजाच्या वतीने रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता ‘श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान, पिंपळगाव रोठा’ पारनेर येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी वाघ्या-मुरलीच्या साक्षीने खंडोबा देवाला तळी-भंडार उधळून महाआरती केली जाणार आहे. दौलतनाना शितोळे यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे, हेच या महाआरतीचे मुख्य साकडे असणार आहे.
यावेळी पारनेर तालुक्यातील समस्त बहुजन समाज, बलुतेदार बांधव आणि जय मल्हार क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाळासाहेब शिरतार यांनी केले आहे. दौलतनाना यांच्या उमेदवारीमुळे बहुजन समाजाला विधीमंडळात हक्काचा आवाज मिळेल, असा विश्वासही यावेळी शिरतार यांनी व्यक्त केला. या नियोजित महाआरतीमुळे पारनेर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.



