पारनेर / भगवान गायकवाड, 

पारनेर तालुक्यातील प्रबुद्ध नगर, करंदी येथे शुक्रवार, १ मे २०२६ रोजी ‘बुद्ध पौर्णिमा’ (वैशाखी पौर्णिमा) निमित्त ‘संयुक्त जयंती प्रबोधन महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. समता सैनिक दलाचे शताब्दी वर्ष, चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आणि महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता सामुदायिक सूत्रपठणाने होणार आहे. त्यानंतर ९:३० वाजता कॉ. पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या प्रसिद्ध पुस्तकाचे वाचन होणार असून सकाळी १० वाजता ‘खीर दान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संध्याकाळी ५:३० वाजता महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता प्रबोधनपर व्याख्यानाचा मुख्य कार्यक्रम होणार असून, त्यात ‘सत्यशोधक मुलनिवासी वारकरी संघाच्या’ प्रबोधनकार कु. आकांक्षा शिंदे या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. रात्री ९ वाजता सामुदायिक स्नेहभोजनाने या महोत्सवाची सांगता होईल.

या कार्यक्रमाचे निमंत्रण संयुक्त जयंती महोत्सव समिती, ब्ल्यू स्टार युथ स्पोर्ट्स क्लब, सत्यशोधक बुद्ध विहार समिती आणि करंदी ग्रामस्थांनी दिले आहे. “सब्बे सत्था सुखी होन्तु” या मंत्राचा उच्चार करत, सामाजिक समतेचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे परिसरात विचारांची नवी प्रेरणा मिळणार असून, महापुरुषांच्या गौरवशाली वारशाची आठवण नव्या पिढीला करून दिली जाणार आहे. समाजातील सर्व घटकांना या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार बनण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *