पारनेर / प्रतिनिधी,
भारतीय अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या अनुदानित आयओटी-सक्षम सेन्सर-आधारित अद्यावत सिंचन व्यवस्थापन प्रणाली प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती उपाययोजना योजनेअंतर्गत कृषी साहित्य आणि खतांचे वाटप कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहभागाने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख संशोधक डॉ. प्रमोद पोफळे, स्मार्ट इरिगेशन प्रकल्पाच्या संशोधक शुभांगी घाडगे, डॉ. शुभम सुपेकर, प्रा. खेमनर यांच्यासह विद्यापीठाचे मान्यवर उपस्थित होते. कासारे ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजीराव निमसे, उपसरपंच शैलाताई घनवट, शिवशंभो शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष तुकाराम साळवे, उपाध्यक्ष देवराम घनवट, सचिव गोकुळ निमसे, खजिनदार उत्तम साळवे, तसेच मिनीनाथ पानमंद, गुणाजी साळवे, प्रदीप साळवे, अशोक निमसे, बबन साळवे, गौतम साळवे, सूर्यभान निमसे, संतोष साळवे यांच्यासह महिला आणि पुरुष बचत गटांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि उत्पादन वाढवणे हा आहे. आयओटी-आधारित सेन्सर प्रणालीद्वारे पिकांना आवश्यक तेवढेच पाणी आणि खते पुरवली जातात, ज्यामुळे पाण्याची बचत होते आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना स्मार्ट इरिगेशन उपकरणे, खते आणि अन्य कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांना शेतीत नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करता येईल.
डॉ. प्रमोद पोफळे यांनी प्रकल्पाच्या तांत्रिक पैलूंवर प्रकाश टाकला आणि शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. शुभांगी घाडगे यांनी स्मार्ट इरिगेशनच्या फायद्यांवर भर देत शेतकऱ्यांना या प्रणालीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. सरपंच शिवाजीराव निमसे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले, तर शेतकरी बचत गटाच्या सदस्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे शेतीतील प्रगतीबाबत आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमाने शेतकऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण केली. उपस्थित शेतकऱ्यांनी आणि बचत गटांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि भविष्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसह टिकाऊ शेतीला चालना देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





